आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत महिला अत्याचाराच्या तीन घटना, एका घटनेत तरुणीची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

हिंगोली- एकतर्फी प्रेमात पडलेल्या तरुणाने सतत दोन वर्षांपासून पळून जाऊन लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या जाचास कंटाळून शहरातील रघुनंदन नगरातील १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज महिला दिनी उघडकीस आली. तर   महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वसमत येथे एका महिलेचा विनयभंग झाला तर हिंगोली येथे एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याने जागतिक महिला दिनीच महिलांवरील अत्याचाराचे चित्र समोर आले.  


शहराजवळील कारवाडी भागातील रघुनंदन नगरात राहणाऱ्या ऋतुजा बालाजी सूर्यवंशी (१९) नावाच्या तरुणीने बुधवारी सायंकाळी आत्महत्या केली. ही घटना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आल्याने या परिसरातील महिला दिनाच्या कार्यक्रमांवर भीतीचे सावट पसरले.  शहरातील खुशालनगर भागातील पापू ऊर्फ तिवरोद्दीन फकरोद्दीन भवरी हा तरुण ऋतुजा हिचा  गेल्या २ वर्षांपासून पिच्छा करीत होता. तू सोबत चल, नसता मी मरून जाईल, असे म्हणून तो तिला आपल्यासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी त्रास देत होता. तर पापूची आई तस्लिमा आणि वडील फकरोद्दीन हेसुद्धा ऋतुजाला पळून जाण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रवृत्त करीत होते. त्यामुळे बुधवारी 
रात्री ऋतुजाने या त्रासाला कंटाळून आपल्या  राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.  
ही घटना आज उघडकीस आल्यावर तरुणीची आई लताबाई सूर्यवंशी यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सदर तरुण आणि त्याच्या आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

 

कर्ज मागणाऱ्या महिलेचा विनयभंग
बुधवारी वसमत तालुक्यातील हट्टा येथील महिलेच्या फिर्यादीवरून युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.  मुद्रा कर्ज मागणाऱ्या सदर फिर्यादी महिलेला, तुला कर्ज हवे असेल तर माझ्यासोबत चल, असे म्हणून बँक व्यवस्थापक अरुणकुमार याने तिचा विनयभंग केला. त्यावरून गुन्हा दाखल झाला.

 

तरुणीवर वर्षभरापासून अत्याचार
अन्य एका घटनेत, हिंगोली येथे ब्युटी पार्लर चालवणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गेल्या वर्षभरापासून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी सरस्वती नगरातील बाळू रामराव मते याच्यावर येथील शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सदर तरुणी वसमत येथील असून ती येथे ब्युटी पार्लरच्या व्यवसायामुळे शहरात वास्तव्यास होती. या तिन्ही घटनांमुळे हिंगोली जिल्ह्यात महिला दिनाच्या कार्यक्रमांवर सावट निर्माण झाले होते.

बातम्या आणखी आहेत...