आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लातूर - राज्यातील अवसायनात निघालेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल्याचे सांगत लातूर जिल्ह्यातील बंद पडलेले किल्लारी, नळेगाव व अंबुलगा येथील साखर कारखाने आगामी गाळप हंगामात सुरू करू, असा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. यासंदर्भात तिन्ही साखर कारखानास्थळी लवकरच व्यापक बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य यांच्यासह महापौर सुरेश पवार यांची उपस्थिती होती. निलंगेकर म्हणाले की मागील काळात राज्यात मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने सुरू करण्यात आले. मात्र यातील काही कारखाने अवसायनात निघाले. त्यामुळे गाळप बंद झाले अन् शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना अधिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विविध उपाययोजनांसह वेगवेगळे उपक्रमही सुरू केलेले आहेत.
शेतकऱ्यांचे हित जोपासण्याठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अवसायनात निघालेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचे धोरण आखले आहे. त्या धोरणाच्या अनुषंगानेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना, नळेगाव येथील जय जवान जय किसान साखर कारखाना व अंबुलगा येथील सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात येणार आहे. आगामी गाळप हंगामात या कारखान्याच्या माध्यमातून त्या-त्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे ऊस गाळप करण्यात येणार आहे.
देशमुखांचे आव्हान स्वीकारले
लातूर जिल्ह्यात देशमुख परिवाराचे साखर कारखानदारीत चांगले काम आहे. जिल्ह्यातील मांजरा, विलास, रेणा, विलास-२, जागृती हे पाच साखर कारखाने देशमुख परिवाराकडून चालवले जातात. हे पाचही साखर कारखाने उत्तम रीतीने सुरू असून या हंगामात या कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या घरात ८०० कोटी रुपये पोहोचले आहेत. साखर कारखानदारीच्या माध्यमातून देशमुख परिवाराची राजकीय पकड आहे.
गेल्याच महिन्यात आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील बंद पडलेले साखर कारखाने निलंगेकर यांनी सुरू करून दाखवावेत, असे आव्हान दिले होते. महिन्यानंतर निलंगेकरांनी हे आव्हान स्वीकारल्याचा संदेश दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.