आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत प्रशिक्षणार्थींच्या विमानांचे लवकरच टेकऑफ!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- चार वर्षांपूर्वी अवकाशात घिरट्या घालणाऱ्या विमानांची गर्दी काही महिन्यांतच ओसरल्यानंतर निराश झालेल्या उस्मानाबादकरांना पुन्हा समाधान देणारी बातमी आहे. उस्मानाबाद विमानतळावरील बंद पडलेले वैमानिक प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यात येत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यांत हे प्रशिक्षण सुरू होऊन प्रशिक्षणार्थींचे विमान टेक ऑफ होण्याची शक्यता आहे. हे मराठवाड्यातील एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे.


बारामती स्थित ब्लू रे एव्हिएशन कंपनीने उस्मानाबाद विमानतळावर प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. एप्रिल २०१३ मध्ये या केंद्रात राज्यासह देशभरातील २२ विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते. पुढे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर जुलै २०१४ मध्ये प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आले. आता मात्र पुन्हा गुजरातमधील अहमदाबादच्या एका कंपनीमार्फत हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय  घेतला आहे. या प्रशिक्षण केंद्राचे नाव पूर्वीचेच म्हणजे ब्लू रे एव्हिएशन असे राहणार असून, मालकी मात्र अहमदाबादच्या कंपनीकडे असेल. दरम्यान काही तांत्रिक मान्यता बाकी असून, दोन महिन्यांच्या अातच सर्व मान्यता मिळून प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू होईल, असे कंपनीचे व्यवस्थापक यात्रिक मेवाडा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. या प्रशिक्षण केंद्रात सध्या ४ विमाने असून, त्यांची दुरुस्ती, प्रशिक्षण केंद्रातील अन्य कामे सुरू आहेत. काही विमानांची ट्रायलही नुकतीच झाली आहे.  प्रशिक्षण केंद्र बंद पडल्याने निराश झालेल्या उस्मानाबादकरांना लवकरच विमानाच्या घिरट्या सुखावतील, अशी आशा आहे.

 

धावपट्टी रिलायन्सकडे 
राज्यातील बारामतीसह नांदेड, उस्मानाबाद आणि यवतमाळ येथील विमानतळांची धावपट्टी रिलायन्स कंपनीला करारावर देण्यात आली आहे. ब्लू रे एव्हिएशन कंपनीने  उस्मानाबाद विमानतळाची धावपट्टी तसेच जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. कंपनीने विद्यार्थ्यांसाठी निवासी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. प्रशिक्षण केंद्र बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी अन्य केंद्रात पाठवले गेले होते.

 

२०० तास विमान चालविण्याची संधी
ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी उस्मानाबाद विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले. २००८ मध्ये  धावपट्टी १२५० मीटरपर्यंत वाढवण्यात आली. त्यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खरण्यात आले.  देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने ही धावपट्टी करारावर दिली आहे. दरम्यान, ब्लू रे एव्हिएशनने प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेशासाठी  २० ते २५ लाख रुपये फीस आकारली होती. निवास, भोजनासह एकूण प्रशिक्षण कालावधीत किमान २०० तास विमान चालवण्यासाठी देण्याचा नियम होता.

 

बातम्या आणखी आहेत...