आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याने पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याची दिली धमकी, मदतीसाठी पुढे आले शेकडो जालनेकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- अंबडकडून येणारा भरधाव आयशर ट्रक शहराच्या दिशेने जात असताना वाहतूक पोलिसांनी चालकाला थांबवण्याचा इशारा केला. चालक ट्रक न थांबवता त्याच वेगाने पुढे निघाला. वाहतूक पोलिसांनी मात्र पाठलाग करुन त्याला अवघ्या काही अंतरावरच गाठले. तेव्हा ट्रकला आडवे झालात तर अंगावरुन ट्रक पुढे नेईन अशी धमकी देत चालकाने ब्रेकवर पाय देऊन ट्रकचे अॅक्सीलेटर वाढवले, आता कोणत्याही क्षणी तो ब्रेकवरचा पाय काढून ट्रक वेगाने पुढे घेऊन जाणार होता. मात्र काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच अवघ्या दोन मिनीटातच येथे शेकडो युवक व जालनेकर गोळा झाल्याने ट्रक चालकाला नमते घ्यावे लागले व मोठा अनर्थ टळला.

 

सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाहतूक शाखेचे कर्मचारी ए.जी.येडके व पवार हे अंबड चाैफुलीवरील चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. त्याचवेळी अंबडकडून आलेला एक भरधाव ट्रक (एच.आर.७४. ए.९७४९) शहराच्या दिशेने निघाला होता. ट्रकमध्ये भरलेले साहित्य ताडपत्रीने झाकलेले होते व ताडपत्रीच्यावर काही लोखंडी साहित्य ठेवलेले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चालकाला थांबवण्याचा इशारा केला मात्र त्याने पोलिसांच्या सूचनेला न जुमानता पुढे निघून जाण्यासाठी ट्रकचा वेग वाढवला. त्यावेळी येडके व पवार या दोघांनी दुचाकीवरुन पाठलाग करीत त्याला पेट्रोल पंपापासून काही अंतरावर त्याला थांबवले. त्यावेळी ट्रकचालकाने ट्रक थांबवला व मला पकडण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा अंगावरुन ट्रक नेईन अशी धमकी देत ट्रकचा अॅक्सीलेटर वाढवला व हे नाट्य घडले.


नो एन्ट्रीबाबत हवे कठोर धाेरण
एरव्ही पोलिस आणि त्यातही वाहतूक पोलिस म्हटले तर तरुणाईच्या टिकेचा विषय असतो. मात्र सोमवारी सकाळी अंबड चौफुली परिसरात वेगळेच चित्र दिसले ते जालना पोलिसांसाठी सकारात्मक होते. केवळ एका ट्रक चालकाने वाहतूक पोलिसांना त्रस्त केल्याचे लक्षात येताच अनेक युवक मदतीसाठी धावून पुढे आले. हे युवक मदतीला आल्याने वाहतूक पोलिसांचे काम सोपे झाले. पोलिसांच्या चांगल्या कामासाठी जालनेकर सदैव मदतीचा हात देण्यासाठी तत्पर आहेत मात्र त्यासाठी पोलिसांनीही नो एन्ट्री आणि वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


अखेर चालकाने नमते घेतले
ट्रक चालकाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिस त्याला खाली उतरण्याचे सांगत असताना तो मात्र काहीच ऐकून न घेता त्वेषाने बोलत होता. हा प्रकार पाहून रस्त्याने जाणारे वाहनचालक व पादचारी थांबून हा प्रकार पाहत होते. पोलिस समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतानाही चालक काहीच ऐकून न घेता पुन्हा-पुन्हा ट्रक अंगावरुन घालण्याची धमकी देत होता. विशेष म्हणजे काही युवक मोबाईलवर त्याचे चित्रीकरणही करीत होते. जवळपास २० मिनीटे हा प्रकार सुरु असल्यामुळे येथे मोठी गर्दी गोळा झाली. गर्दीतील युवकांनी आक्रमक भुमिका घेतल्यानंतर त्याने नमते घेत ट्रक बंद केला. 


भरधाव वाहनांवर हवे नियंत्रण
अंबड चौफुली ते रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावरुन खते,अन्नधान्य,सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकची संख्या अधिक असते. ही सर्व वाहने अत्यंत वेगाने धावत असतात. या मार्गावरुन शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्याशिवाय सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत या मार्गावर वाहनांची व पादचाऱ्यांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे किमान यावेळेत भरधाव अजवड वाहनांवर नियंत्रण असले पाहिजे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र वाहनचालक सर्रासपणे त्याकडे दूर्लक्ष करतात. 


ट्रकचालकाचा उद्दामपणा
पोलिसांनी थांबवल्यानंतरही हा ट्रकचालक आणखी वेगाने ट्रक पुढे घेऊन जात होता. कुणी अाडवे आले तरी मी ट्रक थांबवणार नाही असे हिंदी भाषेत तो धमकावत होता. पोलिसांनी त्याला खाली उतरण्याचे सांगीतले तरी आक्रस्तळेपणाने बोलत होता. पोलिसांच्या मदतीला गर्दी गोळा झाली नसती तर तो भरधाव वेगाने पुढे निघून जाण्याच्या तयारीत होता. याच रस्त्यावर पुढे वर्दळीचा भाग असल्याने अनर्थ घडण्याची पोलिसांनाही भीती होती.


जालनेकर युवकांची अशीही शिस्त
दोन्ही वाहतूक पोलिस उद्दाम ट्रकचालकाला समजावण्याचा प्रयत्न करीत असताना अनेक युवक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी वाहतूकीला अडथळा हाेणार नाही अशा पध्दतीने वाहनांना वाट मोकळी करुन दिली. चालक परप्रांतीय असुनही महाराष्ट्र पोलिसांना धमकावत असल्याचे पाहून काही उत्साही युवकांनी त्याला खाली घेऊन चोप देण्याची भाषाही केली. मात्र त्याला कोणत्याही प्रकारे मारहाण न करता कायद्यानुसार शिक्षा देऊ असे म्हणत जालनेकरांनी शिस्तीचे दर्शन घडवले.


ट्रक चालकाला केला दंड
या प्रकारानंतर पोलिसांनी स्वत: ट्रकमध्ये बसुन हा ट्रक वाहतूक शाखेत जमा केला. तेथे त्याला हजार रुपये दंड करण्यात आला.


मुजोरी कोण संपवणार
अवजड वाहने शहरात भरधाव वेगाने धावत असतील तर काहीजण त्यांना समज देतात मात्र मुजोर चालक त्याला जुमानत नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...