आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहातून पळून जाण्याचा कैद्यांचा प्रयत्न,20 फूट उंच भिंतीवरून उडी मारताच पाय मोडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- स्वयंपाकाला मदत करण्यासाठी बाहेर आणलेल्या कैद्याने सुरक्षेसाठी तैनात पोलिस झोपेत असल्याचे पाहून साथीदारासह पळून जाण्याचा कट रचला.  कारागृहाच्या २० फूट उंच भिंतीवर दोघेही चढले.  एकाने हिमतीने कारागृहाबाहेर उडी मारली. पण  पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी होत बेशुद्ध पडला. हे पाहून भिंतीवर चढलेल्या दुसऱ्या साथीदाराने पळून जाण्याचा बेत रद्द करून खाली उतरत पुन्हा कारागृहात परतणे  पसंत केले.  इकडे, कैदी तासभर कारागृहाबाहेर भिंतीजवळ बेशुद्ध होता. काही वेळाने शुद्ध आल्यानंतर तो कारागृहाच्या कंपाऊंड बाहेर आला. पण शुद्ध हरवून बसला. नागरिकांनी त्याला रुग्णालयात भरती केले. तो कैदी असल्याचे कळल्यानंतर कारागृह प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. तोपर्यंत प्रशासनाला याची खबरबातही नव्हती.


ज्ञानेश्वर बालाजी जाधव (३०, रा. रूपचंद नगर तांडा, रेणापूर, जि. लातूर) या  सराईत गुन्हेगारावर दरोडा, जबरी चोरीचे  अनेक गुन्हे नोंद आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील दरोड्याच्या प्रकरणात अटकेनंतर ४ सप्टेंबर २०१७ पासून तो बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी आहे. त्याच्या बराकीतच विकास मदन देवकते हा दुसरा एका गुन्ह्यातील आरोपीही राहतो. कारागृहातील स्वयंपाक्याला मदत करण्यासाठी रोज काही कैद्यांना काम दिले जात होते. गुरुवारी १४ कैद्यांना पहाटे पाच वाजता बराकीबाहेर काढण्यात आले होते. स्वयंपाकाला पाणी आणण्यासाठी विहिरीकडे जातो म्हणून हे दोघेही विहिरीकडे निघाले. मात्र, सुरक्षा रक्षक झोपेत असल्याचे पाहून ज्ञानेश्वर आणि विकास यांनी कारागृहाच्या भिंतीवरुन उडी मारून पळून जाण्याचा बेत आखला.

 

एकमेकांच्या मदतीने सर केली भिंत
जवळपास वीस फुटांची तटबंदीची भिंत ज्ञानेश्वर व विकास यांनी एकमेकांना मदत करत सर केली. ज्ञानेश्वर हा विकासच्या खांद्यावरून भिंतीवर चढला. तर पाण्यासाठी आणलेल्या भांड्यांच्या साहाय्याने विकास भिंतीवर चढण्यात यशस्वी झाला. त्याला बालाजीने हात देऊन वर खेचले. 

 

उडी मारताच पाय मोडला
२० फुटांच्या भिंतीवरुन बालाजीने पळून जाण्यासाठी उडी मारली.  मात्र खाली पडताच त्याचा पाय मोडला अन् तो जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याची ही अवस्था पाहून  विकास घाबरला. त्याने पळून जाण्याचा  इरादा बदलून भिंतीवरून खाली उतरून तो परत कारागृहात गेला.

 

जखमी कैद्याला नागरिकांनी नेले रुग्णालयात 
सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास तासभर बालाजी हा कारागृहाच्या भिंतीजवळ बेशुद्धावस्थेत होता.  शुद्ध आल्यानंतर  तो  मागच्या बाजूने कारागृहाबाहेर आला. मात्र  तो पुन्हा रस्त्यालगत  बेशुद्ध पडला. काही नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात भरती केले. जिल्हा रुग्णालयातून निरोप येईपर्यंत कारागृह प्रशासनाला कैदी पळाल्याची खबरच नव्हती. याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

उपमहानिरीक्षकांनी दोघांना केले निलंबित
दरम्यान, या घटनेनंतर कारागृह विभागाचे उप महानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी बीड जिल्हा कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. प्रकरणाची चौकशी करून त्यांनी रात्रपाळीला असलेले हवालदार प्रकाश मस्के व शिपाई रमेश हांडे या दोघांना तडकाफडकी निलंबित केले. कर्तव्यावर असताना झोप घेत असल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

 

> या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सध्या मी वरिष्ठासोबत असल्याने माहिती देऊ शकत नाही. नंतर माहिती दिली जाईल.

- महादेव पवार, कारागृह अधीक्षक

 

क्षमता १६०, कैदी ३००

 जिल्हा कारागृहात कैदी पळून जाण्याच्या, कैद्याने आत्महत्या करण्याच्या, आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. जिल्हा कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता अवघी १६० आहे. तरीही सध्या कारागृहात तब्बल ३०० कैदी आहेत.

बातम्या आणखी आहेत...