आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत उडीद खरेदीत 2000 क्विंटलचा घोटाळा; 30 शेतकऱ्यांचे धनादेशही वटेनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- पणन महासंघाने येथील जिल्हा खरेदी विक्री संघाला उडीद खरेदी करण्याचे अधिकार दिले होते. परंतु यात सुमारे २००० क्विंटल उडीद व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आले. तर व्यापारी, पणन महासंघ आणि खरेदी विक्री महासंघाचे लागेबांधे असल्याने जिल्ह्यात ३० शेतकऱ्यांचे धनादेश बँकेत वटले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


परभणी येथील पणन महासंघाच्या कार्यालयाकडून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमधील कृषिमाल आधारभूत किमतीने खरेदी केला जातो. हे काम पणन महासंघ स्वतः न करता, कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा खरेदी विक्री महासंघाकडून करते. यावर्षी उडीद पिकाची आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे काम हिंगोली जिल्ह्यात जिल्हा खरेदी-विक्री महासंघाला देण्यात आले होते. खरेदी विक्री महासंघाने ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात उडीद खरेदी केली. परंतु या खरेदी महासंघाने शेतकऱ्यांकडून येणाऱ्या उडदाच्या खरेदीसाठी केवळ दीड क्विंटलची मर्यादा टाकली. शेतकऱ्यांकडे १० क्विंटल उडीद पिकाला तरीही खरेदी विक्री महासंघ म्हणजेच पणन महासंघ केवळ दीड क्विंटल उडीद खरेदी करणार. खरेदी विक्री महासंघाने यावर्षी जिल्ह्यात खरेदी केलेल्या उडदामध्ये सुमारे २ हजार क्विंटल उडीद केवळ व्यापाऱ्यांकडून खरेदी केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला उडीद कोणत्याही बनावट शेतकऱ्याच्या नावे विकून पैसा लाटला आहे. या व्यवहारात सुमारे ५० लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांनी उडीद खरेदीबाबत केलेल्या तक्रारीनंतर येथील मराठा शिवसैनिक सेनेचे प्रमुख विनायक भिसे यांनी परभणी येथील पणन महासंघाच्या तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली. या चौकशीत जिल्हा खरेदी विक्री महासंघाकडून खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच खरेदी विक्री महासंघाला शेतकऱ्यांनी विकलेल्या उडदापोटी पणन महासंघाने पैसा देऊनही शेतकऱ्यांचे धनादेश का वटवण्यात आले नाहीत, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे परभणी येथील पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.   

 

मराठा शिवसैनिक सेनेच्या तक्रारीनंतर प्रकार उघड 
येथील मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला. तक्रारीनंतर पणन महासंघाचे हिंगोली-परभणी जिल्ह्याचे संचालक ए. सी. शेवाळे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत उडदाच्या सुमारे २००० क्विंटल खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे तसेच ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे धनादेश न वटल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

लवकरच तक्रार देणार   
पणन महासंघ, जिल्हा खरेदी विक्री महासंघ व व्यापाऱ्यांचे लागेबांधे असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली. या संदर्भात खरेदी विक्री महासंघ आणि पणन महासंघाच्या जबाबदार अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी लवकरच तक्रार देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे धनादेश वटले नाहीत, त्यांच्या वतीने पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे.  
- विनायक भिसे, अध्यक्ष, मराठा शिवसैनिक सेना.

 

 

त्या प्रकाराची चौकशी सुरू  
हिंगोली येथील खरेदी-विक्री महासंघाने आधारभूत किमतीवर झालेल्या उडीद खरेदीत केलेल्या अनियमिततेची चौकशी सुरू आहे. या प्रकारात शेतकऱ्यांचे धनादेशही न वटताच परत आल्याने त्या शेतकऱ्यांना अगोदर रक्कम देण्यात येणार आहे. तसेच किती उडदाच्या खरेदीत गैरप्रकार झाला, याची आकडेवारी पणन महासंघाकडून घेण्यात येत असून एक दोन-दिवसात सर्व माहिती मिळेल. 
 - ए. डी. मोरे,  तालुका निबंधक, हिंगोली.

बातम्या आणखी आहेत...