आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसेज पाठवून व्यक्त केली होती घातपाताची भीती;शेवटी मित्रांनीच गळा आवळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडीगोद्री/शहागड- ट्रकच्या व्यवहारातून मित्रानेच जेवणात मादक पदार्थ कालवून मित्राचा खून केला. त्यानंतर मृतदेह रस्त्यावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. अंबड तालुक्यातील पाथरवाला शिवारात सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. मृत अनंत श्रीकांत इंगोले (२८) हा युवक  बीड जिल्ह्यातील समनापूर येथील रहिवासी असून त्याचा बीड येथे इंटरनेट कॅफे आहे. शिवाय तो औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. नातेवाइकांकडून उसणे पैसे घेऊन त्याने मित्रासोबत भागीदारीत ट्रक विकत घेतला होता. आता ट्रक विकून तो नातेवाइकांचे पैसे परत करणार होता. त्यासाठीच औरंगाबादहून बिडकडे जात असताना मित्राने अन्य काही लोकांच्या मदतीने त्याचा घातपात केला.

 

वायरने बांधले होते हातपाय 
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अनंतचा मृतदेह अर्धवट जळाला होता. खून करण्यापूर्वी त्याचे हातपाय वायरने बांधण्यात आले होते. पाथरवाला गावापासून जवळच असलेल्या कुरण शिवारात हा मृतदेह रस्त्यावरच पडलेला होता. त्याच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. 

 

गळा आवळून खून केला 

अनंतचा गळा आवळून खून केल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनी शहागड येथेच मृतदेहाचे  विच्छेदन केले. त्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

मोबाइलही अर्धवट जळाला 
अनंतचा मोबाइल अर्धवट जळाला असून तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. प्रवासात असताना अनंतने त्याच्या भावाला फोनवरून मेसेज केला होता, असे त्याचे चुलते भास्कर इंगोले यांनी   फिर्यादीत म्हटले आहे. मात्र मोबाइल जळाला असल्याने त्यातील माहिती मिळू शकली नाही. 

 

पथक औरंगाबादला  
मृत युवकाने धुमाळ व अन्य काही लोकांकडून  भीती वाटत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार संशयितांच्या शोध घेत आहोत. सपोनि मच्छिंद्र सुरसे यांच्यासह एक पथक औरंगाबादकडे पाठवले आहे. आरोपींना लवकर अटक करू. 
- रामनाथ पोकळे, पोलिस अधीक्षक, जालना.

 

मृताचे काका भास्कर इंगोले यांचा FIR जसाच्या तसा  
मा झा पुतण्या अनंत श्रीकांत इंगोले हा बीडच्या बसस्थानकामागे इंटरनेट कॅफे चालवत होता. सोमवारी पहाटे ३.५० वाजेच्या सुमारास आमच्या गावचे पोलिस पाटील अंगदराव भानुदास गोरे यांचा फोन आला. त्यात पाथरवाला शिवारात (ता. अंबड,जि.जालना) एक पुरुष जातीचा मृतदेह अर्धवट जाळण्यात आला आहे. त्याच्या खिशात अनंत श्रीकांत इंगोले (समानपूर,ता.जि.बीड) या नावाचे आधार कार्ड सापडले आहे. पोलिस पाटील गोरे यांना गोंदी पोलिसांनी ही माहिती दिल्यानंतर मी पाथरवाला येथे पोहोचलो. हे प्रेत माझा पुतण्या अनंत श्रीकांत इंगोले (२८) याचे असल्याचे ओळखले. अनंत दोन महिन्यांपासून औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याचा जवळचा मित्र व बीड पंचायत समितीमधील ग्रामसेवक तुकाराम घोलप यांनी मला सांगितले की, अनंतने धुमाळ नावाच्या मित्रासोबत भागीदारीत ट्रक घेऊन मुंबई येथे व्यवसाय सुरू केला होता. हा ट्रक घेण्यासाठी अनंतने नातेवाइकांकडून उसणे पैसे घेतले होते. मात्र ती कंपनी बंद झाल्याने अनंत ट्रक विकून नातेवाइकांकडून घेतलेले पैसे परत करणार होता. त्यासाठी धुमाळ स्वत: रविवारी बीडमध्ये येऊन हिशेब पूर्ण करून देणार होता ही माहिती अनंतनेच मित्र घाेलपला दिली होती. रविवारी अनंत हा धुमाळ व इतर लोकांसह चारचाकी वाहनाने बीडला येत होता. रात्री अंदाजे ९.३० वाजेच्या सुमारास घोलप यांनी अनंतला फोन केला तेव्हा अनंतने आम्ही पाचोडच्या ढाब्यावर जेवणासाठी थांबलो असे सांगितले होते. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अनंतने घोलप यांना फोन केला व माझा घातपात होण्याची शक्यता आहे. धुमाळ व सोबतच्या इतर लोकांचे लक्षण काही ठीक दिसत नाही, असे म्हणत अनंतने भीती वाटते आहे असे सांगितले. लघुशंकेच्या बहाण्याने बाजूला येऊन त्याने हा फोन केला.  मात्र ते लोक अनंतकडे येत असल्याने त्याने फोन कट केला. त्यानंतर काही वेळातच अनंतने मोठा भाऊ गोविंद याच्या मोबाइलवर तीन मेसेज केले. त्यात ‘मी धुमाळ सोबत आहे, त्याच्याकडून २१ लाख रुपये येणार आहेत, त्याचे लक्षण ठीक दिसत नाही’ असे नमूद केले. त्यानंतर सोमवारी पहाटे धुमाळ व इतर लोकांनी त्याचा रस्त्यातच घातपात करून प्रेत शहागड ते पाथरवाला रस्त्यावर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...