आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजाची जाणीव बोथट झाली, लोकांचे सुख-दुःख समजून घेतले पाहिजे; डॉ. कदम यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पळसप- समाजाची जाणीव बोथट झाली आहे, लोकांचे सुख-दुःख समजून घेतले पाहिजे. जिथे संवाद असतो. तिथे माणूस बिनघोर असतो. महानुभाव यांनी संवादाचे महत्त्व वेळोवेळी सांगितले आहे. संकट आज-उद्या नाहीत, उद्याची पहाट ही माझी असेल, असा आत्मविश्वास होता. परंतु आज माणसामाणसातील संवाद बंद झाला आहे.संवाद घडवण्याचे काम ग्रामीण साहित्य संमेलनात होत आहे. संवेदना चेतवण्याचे काम संमेलने करतात, असे मत ६ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जगदीश कदम यांनी व्यक्त केले. 


स्व.वसंतराव काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पळसप येथे ६ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन शुक्रवारी(दि.२) पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉ. जगदीश कदम बोलत होते.यावेळी संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक तथा सहकार विभागाचे सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले.यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, आ. दत्ता सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, व्ही.बी.पवार, डॉ. जयेश मोहिते,दिलीप बडे, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, चित्रकार प्रकाश घादगिणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


यावेळी बोलताना डॉ.कदम म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांचा विचार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून झाला पाहिजे. ग्रामीण भागातील प्रश्न भयानक आहेत. कष्टकरी, शेतकरी माणूस नागवला जात आहे, त्याची व्यथा मांडली पाहिजे. या व्यवस्थेची लबाडी लोकांसमोर आली पाहिजे. यासर्व प्रश्नांच्या तळाशी जाऊन उत्तर शोधण्याची शक्ती फक्त लेखणीत आहे. ही लेखणी आता परजून ठेवायला हवी. आजपर्यंत महिलांचा पदर शाबूत होता. त्यामुळे कुटुंब झाकून जात होते. परंतु आता तोच पदर फाटतो की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे, अशी खंत डॉ. कदम यांनी व्यक्त केली.लोकशाहीच्या चार स्तंभापैकी तिसरा स्तंभ आपली कैफियत मांडण्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे धाव घेत आहे. परंतु हा चौथा स्तंभ तरी सुरक्षित आहे का, असा सवाल ही डॉ. जगदीश कदम यांनी केला.

 

खिसेकापू सरकार 
आजचे सरकार शेतकऱ्यांचे खिसे कापू सरकार आहे. बहुजनांचे शिक्षण मोडीत काढण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी केला. मराठी शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला असून त्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे आ.काळे यांनी सांगितले.

 

> पळसप येथील मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी ग्रंथदिंडीसमोर शालेय विद्यार्थिनींनी खेळ सादर केले.

बातम्या आणखी आहेत...