आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकारच्या घोषणा दमदार; त्यांची अंमलबजावणी मात्र शून्य!- अशोक चव्हाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- शेतकरी, नोकरदारांना भुलवण्यासाठी भाजप सरकारकडून विविध स्वरूपाच्या जाहिराती जोरदारपणे केल्या जातात. परंतु,  या प्रमाणात  कृती शून्य आहे.   मी लाभार्थी सारख्या जाहिरातींमध्ये लाभ नसलेल्यांचे फोटो टाकून जनतेची दिशाभूल केली. बोंडअळीचे नुकसान, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी, रोजगार यासह विविध घोषणा भाजप सरकारने केल्या. परंतु, त्या घोषणांवर दमदार अंमलबजावणी होत नाही. यासोबतच कुणी मंत्री संविधान बदलण्याचे तर कुणी मंत्री मुसलमानांना देशाबाहेर काढण्याचे वक्तव्य करीत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे केली. 


काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे जालना दौऱ्यावर आले असता ते पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी मोहन प्रकाश, राधाकृष्ण विखे पाटील, हुसेन दलवाई, आरेफ नसीम खान, माजी आमदार सुरेश जेथलिया, कैलास गोरंट्याल, राजेंद्र राख, विमल आगलावे आदींची उपस्थिती होती.


पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, फसवे सरकार म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे. या सरकारच्या हुकूमशाही धोरणामुळे प्रत्येक घटकाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. नुकतेच विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.

खासगीकरणाच्या माध्यमातून कामे करण्यावर सरकार भर देत आहे. या विविध त्रासामुळे अनेक नेते काँग्रेसमध्ये येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. संविधान बदलण्याचे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर पक्ष कारवाई का करीत नाही , असाही प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. खोट्या जाहिरातींपेक्षा रामदेव बाबांसारखे खरे लाभार्थी आहेत. विदर्भातील विशिष्ट जिल्हे सोडता सरकारने मराठवाड्यात कुठेच विकास केला नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीही महाराष्ट्रात सर्वाधिक झाल्या आहेत. हुकूमशाही पद्धतीने केल्या जात असलेल्या या सरकारच्या राजकारणाला कंटाळून अनेक नेते, मंत्री काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असा दावा करून याची प्रचिती तुम्हाला लवकरच दिसेल, असेही  चव्हाण म्हणाले. 

 

हेक्टरी ५० हजार द्या 
गारपीट झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी  ५० हजारांची मदत द्या. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. तोकड्या मदतीवर शेतकऱ्यांची बोळवण करू नका. हेक्टरी ५० हजारांचे अनुदान मिळवून देण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  

 

अॅडजस्टमेंट करणार नाही 

आरएसएसचे मोहन भागवत यांनी भारतीय जवानासंदर्भात केलेल्या दुर्दैवी वक्तव्याचा अशोक चव्हाण यांनी निषेध केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी शिवसेनेची अॅडजस्टमेंट केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.