आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळा फुलू द्या, संस्कारसुगंध दरवळू द्या ! बाल-कुमार साहित्य संमेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, हेलस शाखेच्या रौप्यमहोत्सवी  वर्षानिमित्त जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे आज मराठी भाषा गौरवदिनी बाल-कुमार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ बाल साहित्यिक दत्ता डांगे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग.

 

महाराष्ट्राची मातृभाषा, राजभाषा मराठीने येथील लोकांचे भावजीवन खुलवले. आईची माया, प्रेम, जिव्हाळा, लळा सारा काही मराठी माणसांना लावला. अमृतासमान ही भाषा. या भाषेत जीवनाचे अमृत, माधुर्य आहे. शब्दांमध्ये साखरपेरणी, जीवन घडविणारी, तृष्णा शमविणारी क्षमता आहे. आपल्या साऱ्या भाषाभगिनींना लळा ती लावणारी आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर गावोगावी मराठी शाळा उघडल्या आणि अंधारगर्भात चाचपडणाऱ्या मुलांच्या जीवनात प्रकाशपर्व सुरू झाले! मुलं-मुली शिकू लागले. त्यातून अनेक सुंस्कारीत पिढ्या घडल्या, घडत अाहेत. 
 परंतु आज मात्र माय मराठी शिकविणाऱ्या शाळांचे चित्र बदलत आहे. मराठी बांधवच जे आज मराठी शाळा ओस पाडून आपल्या इंग्रजी शाळा कशा पोसल्या जातील यासाठक्ष सर्वशक्ती पणाला लावत आहेत. मराठी शाळा बंद पाडून इंग्रजी शाळा चालविण्याचा त्यांचा हेतू  स्पष्टच आहे. यात त्यांचे इंगजी भाषेवर फार प्रेम आहे म्हणून ते इंग्लिश स्कूल्स काढताहेत असे नव्हे तर धनलोभ हा हेतू अाहे. परंतु यामुळे आपणच मराठीचे वैभव-अलंकार उतरवून ठेवत आहोत याची जाण येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट होय!


मराठी शाळा या खरे तर संस्कारशाळा होत. प्रत्येक दिवस जणू एक सण. दररोज जणू एक बाल-कुमार साहित्य संमेलन, स्नेहसंमेलन होय. अखंड वाहणारी ज्ञान गंगा जणू! म्हणून शाळेचे हे सर्व स्वरूप टिकायला हवेत. सरकारने मराठी माध्यमांच्या शाळा बंद करण्यापेक्षाही गत सुवर्णकाळ पुन्हा एकदा कसा आणता येईल यासाठी सर्वंकष प्रयत्न केले पाहिजेत. मुले शाळेच्याच वेळेत शिकली पाहिजेत... त्यांचा शिकवणीवर्गात जाऊन दररोजचा ४/५ तासांचा वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. पालकांची आयुष्यभराची जमा केलेली पुंजी मुलांच्या शिक्षणातच शिकवणी वर्गांमुळे संपून चालली आणि मुलींच्या लग्नाच्यावेळी ते कंगाल होत आहेत. तेव्हा पालकांना कंगाल होण्यापासून वाचवायचे असेल... एक मोठे पुण्याचे कार्य करावयाचे असेल तर शिक्षकांनी वर्गातच तन-मन लावून विद्यार्थ्यांना शिकवायला हवे.

 

त्यांच्यावर सुसंस्कार घडवायला हवेत... संपूर्ण पालकवर्ग त्यांचा ऋणी राहील! पालकांनीही मुलांना शंकरपटाला जुंपलेल्या गोऱ्ह्यांसारखे अपेक्षांच्या ओझ्यांचे जू खांद्यावर ठेवून दमछाक होईपर्यंत पळवू नये... त्याऐवजी मुलांच्या व्यायाम, प्रार्थना, भावंड, मित्रांशी बोलण्या- खेळण्याचा वेळ, आपलाही त्याच्याशी हितगुज करण्याचा वेळ ठरवून घेतला पाहिजे. शेतीवाडीत, निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना घेऊन गेले पाहिजे. तरच पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठी शाळा बहरतील! मराठी भाषेचा संस्कारसुगंध सर्वत्र दरवळू लागेल! ते साेनेरी दिवस लवकरच यावेत! या अपेक्षेसह धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...