आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गस्तीवरील कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवणार बीड पोलिसांचे अॅप!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- गस्तीवरील पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी आता बीड पोलिस दलाने नवे अॅप सुरू केले आहे. १६ पोलिस ठाण्यांमध्ये दोन दिवसांत प्रायोगिक तत्वावर या अॅपचा वापर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली. गस्तीवरील कर्मचाऱ्याला आता अॅपमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती दाखवतानाच सेल्फीही अपलोड करावा लागणार आहे. गस्तीसाठी असलेल्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यापूर्वीच सुरू करुन कामचुकार कर्मचाऱ्यांना दंड करण्यात येत होता. अाता नवीन अॅपने पोलिस दल आणखी डिजिटल हाेणार आहे.


अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यापासूनच एसपी जी. श्रीधर यांचे पोलिस दलाला हायटेक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री गस्तीदरम्यान अनेक कर्मचारी कामचुकारपणा करतात. कमी वेळ गस्त करणे, अनुपस्थित राहणे असे प्रकार निदर्शनास आल्यानंतर श्रीधर यांनी गस्तीच्या  वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम बसवली होती. यामुळे वाहन गस्तीवर  किती वेळ फिरले, कुठल्या भागात फिरले, कुठे थांबले याची नोंद होत होती. आता यापुढे जाऊन गस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही वॉच असावा यासाठी नवीन अॅप तयार करून घेण्यात आले आहे. १६ ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर या अॅपचा वापर केला जाणार आहे.


काय आहे अॅपमध्ये
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी(उदा. बँक, एटीएम, सराफा दुकान, मंदिर, एखादे सार्वजनिक ठिकाण)  क्यू आर कोड बनवून चिकटवले  जातील. गस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मोबाइलमध्ये दिलेल्या अॅपमध्ये तो कोड कर्मचारी स्कॅन करेल. कोड स्कॅन करताना मोबाइलमधली बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करावा लागेल. 


असा होईल फायदा
बायोमेट्रिक प्रणाली व सेल्फीमुळे कर्मचारी गस्तीवर अनुपस्थित राहू शकत नाही. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याची वेळही नोंद होईल.  त्यामुळे किती वाजता कुठल्या पॉइंटवर गस्त झाली याचीही खातरजमा होईल. वाहनांना जीपीएस असल्याने पेट्रोलिंगची गाडी कुठल्या भागात गेली अथवा गेली नाही हेही कळते. यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना चाप लागेल.

 

ग्रामीण भागातील पहिला प्रयोग
क्यू आर कोड स्कॅनिंगचा प्रयोग मेट्रो सिटीमध्ये केला जातो. मात्र ग्रामीण भागात पहिल्यांदाच हा तो करण्यात येत आहे. सकारात्मक परिणाम दिसतील.पोलिस दल हायटेक करण्याचा प्रयत्न आहे.
- जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड


या सोळा ठाण्यांमध्ये प्रयोग
बीड शहर, शिवाजीनगर, पेठ बीड, बीड ग्रामीण, माजलगाव शहर, वडवणी, अंबाजोगाई शहर, परळी शहर, केज, धारुर, नेकनूर, शिरुर, पाटोदा, गेवराई, संभाजीनगर, पिंपळनेर या ठाण्यांमध्ये प्रयोगिक तत्वावर अॅपचा वापर होईल.  यानंतर याचे परिणाम पाहून इतर ठिकाणीही वापर केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...