आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखाला गंडवणारे ‘त्या’ नववधूचे आई-वडीलही गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- औरंगाबाद येथील मुलीचे परतूर तालुक्यातील संकणपुरी येथील एका मुलाशी ११ फेब्रुवारी रोजी लग्न लावून दिले होते. दरम्यान, दोघा जणांनी २२ फेब्रुवारीला नवरीसोबत येऊन संकणपुरी येथे मुलाच्या घरी मुक्काम करीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नवरीसह सकाळीच पलायन केले.  या प्रकरणी पोलिसांनी त्या मुलीच्या औरंगाबाद येथील मुकुंदवाडी भागातील जय भवानीनगर येथे चौकशी केली असता तिचे आई-वडील भाड्याने घर करून राहत असल्याचे आणि ते घरूनही पसार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.  या प्रकरणी रामा बबनराव पानझाडे यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फसवणूक व चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. औरंगाबाद येथील मुकुंदवाडी भागातील जय भवानीनगर भागातील एका मुलीचे रामा पानझाडे याच्याशी ११ फेब्रुवारी रोजी एका दिवसातच लग्न लावून देण्यात आले होते. यानंतर मुलगी काही दिवस औरंगाबाद तर काही दिवस संकणपुरी येथे राहिली. दरम्यान, संतोष इंगळे, राजू इंगळे हे या मुलीसोबतच संकणपुरी येथे २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजता आले. त्यांनी  तिच्या घरी मुक्कामी थांबत भल्या पहाटे घरातील कपाटातून १ लाख ३० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने  व रोख ३० हजार रुपये काढून  ३ वाजता पोबारा केला होता. 


यानंतर रामा पानझाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार चंद्रकांत पवार यांचे पथक नववधूच्या माहेरी चौकशीसाठी गेले होते. परंतु, औरंगाबाद येथील जय भवानीनगर येथे तिचे पालक भाड्याने राहत असल्याचे आणि तेथूनही ते बेपत्ता झाल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले आहे.  यामुळे तपासाला संथ गती आली आहे. नवरदेवाची अशा प्रकारची फसवणूक झाल्यामुळे गाव परिसरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...