आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरूच;नारायणगडावर मुख्यमंत्री फडणवीस यांची हमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- राज्यात कर्जमाफी ७० टक्के पूर्ण झालेली असुन महाराष्ट्रातील  शेवटच्या घटकापर्यंतचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना सुरूच  राहील, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली.


शिरूर तालुक्यातील श्री श्रेत्र नारायणगडावर दुपारी २५ कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन गुरुवारी झाले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, आमदार भीमराव धांडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पीक विम्यात  मराठवाड्यात दोन वर्षात दोनशे कोटी रुपये मिळाले. तर एकट्या बीड जिल्ह्याला ८०० कोटी रुपये मिळाले आहेत. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषित केली.  राज्यात दोन महिन्यात ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५०० कोटी जमा झाले आहेत. बीड जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पूर्वी राज्याचे कृषी क्षेत्राचे बजेट केवळ २१ हजार कोटी होते. आता ते ६६ हजार कोटींपर्यंत गेले आहे. २०१९ पर्यंत राज्यात सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार असून प्रत्येक गरीब माणसाला घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. येत्या ३१ मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्र पाणंदमुक्त होणार आहे. असेही  फडणवीस यांनी सांगितले. 


पोलिस विभागात आगामी काळात पन्नास हजार रिक्त जागांची भरती केली जाणार असून ती दोन टप्प्यात  राहणार आहे. ही भरती पारदर्शी कशी होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

  श्रेय घ्यायचे नाही
बीड जिल्ह्यात २०१४ ते २०१७ या तीन वर्षाच्या काळात जिल्ह्यात ७०० किलोमीटरचे रस्ते होत असून ६५०० अंतराचे केंद्रीय रस्ते पूर्ण झाले आहेत. दहा हजार कोटी रुपयांची कामे जिल्ह्यात झाली आहेत. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ पडली तर अमेरिकेहून निधी खेचून आणू.  मला कोणतेही श्रेय घ्यायचे नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...