आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ बालकाचा अनैसर्गिक अत्याचारानंतर नव्हे, तर सावत्र आजीने गळा दाबून केला खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- वसमत तालुक्यातील गणेशपूर येथील ४ वर्षीय बालक चार महिन्यांपूर्वी जखमी अवस्थेत आढळून आला होता. मुंबई येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध अनैसर्गिक कृत्य करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. परंतु शवविच्छेदन अहवालानुसार, पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.  हा आरोपी दुसरा तिसरा कुणीही नव्हे तर त्या बालकाची सावत्र आजीच निघाली असून त्याचा गळा दाबून  खून केला होता, अशी कबुलीही तिने पोलिसांना दिली आहे.


 वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद व ग्रामीण पोलिस ठाण्यातील  एपीआय अशोक जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,   श्रेयश बालाजी वाघमारे हा  सप्टेंबर २०१७ मध्ये उसाच्या शेतात जखमी अवस्थेत सापडला होता. त्यास काहीतरी चावले म्हणून वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास नांदेड येथे दाखल करण्यात आले. तेथेही दुरुस्त न झाल्याने त्याला मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले. पण मुंबई येथे जेजे रुग्णालयात ३ ऑक्टोबर २०१७ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत बालकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अनैसर्गिक कृत्य करून बालकाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध जेजे रुग्णालय पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई येथून सदर प्रकरण वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात मृत बालकाच्या नातेवाइकानीं व्यक्त केलेल्या संशयावरून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु तपासात त्यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.  त्यानंतर शवविच्छेदन अहवालात अनैसर्गिक अत्याचार झालाच नसल्याचे स्पष्ट झाले. बालकाचा मृत्यू गळा आवळल्याने केल्याचेही या अहवालात म्हटले होते. पुढे त्यानुसार तपास सुरू झाला.  

तपास भरकटवण्याचा प्रयत्न
पोलिसांची  जाणीवपूर्वक दिशाभूल करून तपास भरकटत ठेवण्याचा मृताच्या काही नातेवाइकांचा प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद, सपोनी अशोक जाधव यांनी  संशयितांवर लक्ष ठेवले.  त्यांच्या वर्तणुकीचा अंदाज घेतला आणि सबळ पुराव्यानिशीच २४ जानेवारीला दुपारी आरोपीला ताब्यात घेतले.  हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृत श्रेयसीची सावत्र आजी रंजनाबाई ऊर्फ यशोदा यादोजी वाघमारे ( ४२) हीच असल्याचे निष्पन्न झाले आणि गावकऱ्यांना धक्काच बसला. नातवाचा आपणच गळा दाबून खून केला अशी कबुली तिने पोलिसांना दिली.

बातम्या आणखी आहेत...