आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांच्या अफवांचे पेव; संशयावरून बदनापूर, मंठा, अंबडला चौघांना मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड/बदनापूर/मंठा -   लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून आपल्या मुलांना बाहेर फिरू देऊ नका, अशी अफवा सोशल मीडियावर फिरत आहे. या भीतीने शेतकरी सायंकाळी लवकर शेतातील कामे आटोपून परत घराकडे निघत आहेत. शिवाय, रात्रभर गस्त घालत अाहेत. दरम्यान, संशयावरून मंठा येथे शनिवारी सकाळी ११ वाजता बसस्थानक परिसरात दोन महिलांना जमावाने मारहाण केली. काही वेळानंतर दोन तरुणांनाही चोप दिला. शुक्रवारी बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात याच पद्धतीने एका भोळसर महिलेस मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ती महिला बचावली. अंबड तालुक्यातील ५ ते ६ गावांतील ग्रामस्थांनी अफवेमुळे रात्र जागून काढली.  


बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण, मात्रेवाडी, मुरूमखेडा, बदनापूर आदी गावांत मुले पळवणाऱ्या महिला व चोर आल्याची अफवा दोन दिवसांपासून पसरत आहे. सोशल मीडियाद्वारे सतर्कतेच्या सूचना व विविध ठिकाणची छायाचित्रे व्हायरल होत असल्याने ग्रामस्थांत भीती आहे. दरम्यान, मात्रेवाडी शिवारातून ताब्यात घेतलेली महिला वेडसर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने तिला सोडून दिले. दरम्यान, केळीगव्हाण येथे गुरुवारी काही तरुणांनी एका अनोळखी व्यक्तीला पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर मात्रेवाडीतही दोन महिला मुले पळवत असल्याची अफवा पसरली. ग्रामस्थांनी त्या महिलांना पकडून पोलिसांना कळवले. या वेळी जमादार निवृत्ती कोरडेंनी पीआय रामेश्वर खनाळ यांना माहिती देऊन त्या महिलांना ताब्यात घेतले. तिला मराठी भाषा कळत नाही. प्रथमदर्शनी तपासात ती वेडसर असल्याचे निदर्शनास आल्याने ठाण्यात आणून त्यांना 
सोडून दिले.     


मंठ्यात भिकारी महिलांना मारहाण 

लहान मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरून मंठा बसस्थानकावर दोन संशयित महिलांना नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर काही वेळातच दोन तरुणांना २०० ते ३०० लोकांच्या जमावाने संशयाच्या कारणावरून बेदम मारहाण करत पोलिस ठाण्यात आणले. तपासाअंती सर्व संशयितांची ओळख पटल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.    

 

शनिवारी बसस्थानकात सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीक मागणाऱ्या दोन संशयित महिला नागरिकांना आढळल्या. उपस्थित नागरिकांपैकी काहींनी प्रश्नांची सरबत्ती करताच महिला गोंधळून गेल्या. नागरिकांनी लगेच पोलिसांना फोन केला. तर काहींनी संशयावरून मारहाण केली. पोलिसांनी या महिलांना ठाण्यात आणताच अफवांचे पेव फुटले. त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या घटनेत ईदच्या निमित्ताने भीक मागणारे दोन संशयित तरुण दिसून आले. त्यांनाही मारहाण करत नागरिकांनी पोलिस ठाण्यात आणले. या दोन्ही घटनांची शहानिशा केल्यानंतर असे लक्षात आले की, ईद मागण्यासाठी हे चौघे शहरात फिरत होते.

 

यातील सविता चव्हाण चारठाणा (ता. जिंतूर)) तर हेमा भगवान पवार बुऱ्हाणपूर (ता. लोणार) येथील असल्याचे निष्पन्न झाले. या दोघी बहिणी असून पोलिसांनी त्यांच्या आईशी संपर्क साधला. चारठाणा येथून त्यांची आई ठाण्यात हजर झाली. दोन्ही आपल्या मुली असल्याचे सांगून त्यांचे आधार कार्ड पोलिसांना दाखवले. दुसऱ्या  घटनेतील दोन्हीही तरुण वाटूर येथील असल्याचे समोर आले असून सचिन रामभाऊ पाटोळे, संभाजी संजय पारखे अशी त्यांची नावे आहेत.     

बातम्या आणखी आहेत...