आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इडा-पीडा टळो, बळीचे राज्य येवो : युवकाने लग्नपत्रिकेतून जागवली शेतकऱ्यांत उमेद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा - ।। शिवबासोबत आहे सामर्थ्य जिजाऊंचे । या नांगरात आहे भवितव्य स्वराज्याचे।। या ओळींमधून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील शेतकरी जसा सुखी होता, त्याप्रमाणे सध्याच्या युगातील शेतकरीही सुखी झाला पाहिजे, असा शेतकऱ्यांमध्ये उमेद जागवणारा संदेश विवाह सोहळ्याच्या निमित्ताने गणेश नेटके या युवकाने दिला आहे. ‘शेतकरी बंधूंनो, धीर सोडू नका, हिंम्मत हारू नका..कारण तुझ्यावर फक्त कुटुंबच नव्हे तर संपूर्ण देश अवलंबून आहे’, असे आवाहन करत बळीराजाला शेती व त्याच्या परिश्रमाचे सामर्थ्य पटवून देण्याचे काम या युवकाने केले आहे.

 
तालुक्यातील भोंजा येथील शेतकरी कुटुंबातील गणेश नेटके या युवकाने त्याची लग्नपत्रिका बळीराजाला समर्पित केली आहे.   ।। इडा पिडा टळो... बळीचे राज्य येवो...।।  असा आशावाद व्यक्त करत त्याने नातेवाइक, आप्तेष्ट, मित्रांना त्याच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे. 

  
अवर्षण, नापिकी व शेतमालाला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यात कर्जाचा डोंगर, मुलींचे लग्न, शिक्षण कसे करायचे या विवंचनेतून शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर त्याने शेतकऱ्यांना हिंमत न सोडण्याचे आवाहन केले आहे. गणेशने त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर देवी-देवता, महापुरुषांचे फोटो न ठेवता बळीराजाचा फोटो ठेवला आहे. लग्न सोहळ्याचे आयोजन गणेश शेतकरी गट प्रतिष्ठान करत आहे. राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळी  बळीराजाला धीर देण्याचा प्रयत्न गणेश याने त्याच्या लग्नाच्या पत्रिकेतून केला आहे.

बातम्या आणखी आहेत...