आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईच्या झळांनी होरपळणाऱ्या तीन गावांना मोफत पाणी देतोय हा भगीरथ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औराळा - भगीरथाने तपस्या करून कपिलमुनीच्या शापामुळे भस्म झालेल्या ६० हजार सागरपुत्रांच्या उद्धारासाठी स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणली होती. त्याप्रमाणेच मराठवाड्यात पाणीटंचाईच्या शापात होरपळणाऱ्या तीन गावांतील ६ हजार लोकांची तृष्णापूर्ती करण्यासाठी जेहूर येथील सोमनाथ जाधव या तरुणाने पदरमोड करून स्वत:च्या शेतातील पाणी टँकरद्वारे तीन गावांना पाणी पुरवले. त्याला त्याच्या मित्रांनीही तेवढ्याच आत्मीयतेने मदत केली.

 

केवळ समाजाचे काही देणे लागते म्हणून या तरुणाने हे सामाजिक दायित्व जपले आहे. 
कन्नड तालुक्यातील जेहूर, जेहूर तांडा, ठाकरवाडी ही तीन गावे पाणीटंचाईत होरपळून निघत होती. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी आटले. हातपंपही निकामी ठरले. प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या विहिरीही कोरड्या पडू लागल्याने आठ दिवसांत एकदा नळाला पाणी येऊ लागले. त्यामुळे पाणीटंचाईत होरपळणाऱ्या ग्रामस्थांना सोमनाथनेच आधार दिला.  साेमनाथ यांनी शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केले होते. पण या तीन गावांतील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी स्वत:कडील ७० हजार रुपये खर्चून नवीन टँकर घेतले.  आपल्या शेतातील विहिरीपासून ते रस्त्यापर्यंत २ हजार फुटांची नवीन पाइपलाइन टाकली. तेथून टँकर भरून दररोज ५ कि.मी. पर्यंतच्या तिन्ही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. गेल्या चार महिन्यांपासून  अविरतपणे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी सोमनाथ यांना चार महिन्यांत  ३ लाखांच्या वर खर्चही आला. ट्रॅक्टरसाठीचे डिझेल, पाइप खरेदी आणि टँकर खरेदी यासाठी हा खर्च लागला. 


स्वत:च्या उत्पन्नावरही फेरले पाणी
मशागतीच्या कामासाठी घेतलेले ट्रॅक्टर  सोमनाथ यांना पाणीपुरवठ्यासाठीच वापरावे लागले. इतरांच्या शेतीची मशागत करून दिल्यास त्यांना दरवर्षी सुमारे साडेतीन 
लाखांची मिळकत व्हायची. पण या समाजव्रतासाठी सोमनाथ यांना या कमाईवरही पाणी फेरावे लागले. 

 

राजकीय लाभ नाही
अनेक मंडळी राजकीय लाभासाठी समाजसेवा करताना दिसतात. पण सोमनाथ आणि  त्याच्या मित्रमंडळातील काेणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा गाव पातळीवर कोणत्याही पदावर नाहीत. 


भाड्याने टँकर घेतले
जेहूर तांडा व ठाकूरवाडी या दाेन गावांत मे महिन्यात जास्तच पाणी टंचाई निर्माण झाल्याने सोमनाथ यांनी  दुसरे टँकर भाड्याने घेऊन पाणी पुरवठा सुरू केला असून अजूनही हे टँकर सुरू आहे.  या टँकरचा नुकताच शुभारंभ पो. नि. सपना शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

शासकीय मदतीचीही अपेक्षा नाही 
समाजाचे काही देणे लागते या एकाच उद्देशाने कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता स्वत:च्या शेतातील विहिरीवरून किंवा वेळप्रसंगी इतर शेतकऱ्यांच्या विहिरींवरून पाणी भरून रात्रंदिवस पाणीपुरवठा केला जात आहे. 


सामाजिक दायित्व
गावातील लहान मुले, वयोवृद्ध महिलांना  हंडाभर पाण्यासाठी वन वन भटकावे लागत होते. हे मला पाहवले नाही.    आपल्याकडे जे आहे त्याचा उपयोग संकटाच्या काळात गावातील लोकांसाठी व्हावा, हाच उद्देश आहे.  
सोमनाथ जाधव, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...