आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकाचे पाऊल: ऊसतोड होत नसल्याने शेतकऱ्याने कारखाना कार्यालयात घेतले विष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- कारखान्याकडून ऊसतोड होत नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने थेट कारखान्याच्याच कार्यालयात विष प्राशन केले. १४ महिने झाले तरी ऊसतोड होत नाही. कारखान्याचा चिटबॉय, ऊसतोड कामगार पैशाची मागणी करतात, असा आरोप करत गावसूदच्या दत्तात्रय देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. हा प्रकार शुक्रवारी (दि.१६) सकाळी १० वाजेच्या सुमारास आयुर्वेद महाविद्यालयासमोर घडला.  


राज्यात उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आठ महिन्यांत जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाला भाव नसणे, मुलींची लग्न अशा विविध कारणांनी हताश होऊन मृत्यूला कवटाळले आहे. त्यात आता ऊसतोडीबाबत होत असलेल्या दुजाभावाची भर पडली आहे.    


 शेतकरी दत्तात्रय देशमुख यांच्या तक्रारीनुसार आई कृष्णाबाई देशमुख यांच्या नावाने गावशिवारात दीड एकर उसाची लागवड आहे. आईच्याच नावाने केशेगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स असून त्यांनी कारखान्याकडे ९ नोव्हेंबर २०१६ व ६ डिसेंबर २०१६ या तारखांमध्ये ऊसलागवडीची नोंदही केली आहे. सध्या त्यांचा ऊस १५ महिन्यांचा असून दोन महिन्यांपासून ते कारखान्याकडे ऊसतोडीसाठी पाठपुरावा करत होते. प्रोग्रामप्रमाणे त्यांची ऊसतोड असतानाही चिटबॉय अतुल चव्हाण, सर्कल प्रमुख सुभाष पडवळ यांच्यासह ऊसतोड मजुरांकडून १५ हजारांची  मागणी होत होती. ती पूर्ण न केल्याने यादीतील देशमुख यांच्या नंतरच्या शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यात आला.  परंतु, देशमुख यांची ऊसतोड होत नसल्याने ते हताश होते. यातूनच त्यांनी शुक्रवारी सकाळी उस्मानाबादेत कारखान्याच्या सर्कल ऑफिसमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली. तरीही तोडगा न निघाल्याने त्यांनी रोगरची बाटली फोडून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. 

कारखाना म्हणतो, शेतात रस्ताच नाही 
कारखान्याच्या म्हणण्यानुसार,  दत्तात्रय देशमुख यांचा ऊस मोठ्या प्रमाणात आडवा पडला असून शेतात जाण्यासाठी रस्ताही नाही.   कारखान्याने चार वेळा ऊसतोड टोळ्या पाठवल्या.  २ फेब्रुवारी रोजी शेवटची टोळी गेली होती. मात्र, देशमुख यांनी रस्ता उपलब्ध करून न दिल्याने टोळी परत आली. देशमुख हेच ऊसतोड टोळीसह कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करतात. 

 

कारखाना कर्मचाऱ्याला मारहाण केली
सदरील शेतकऱ्याकडे चार वेळा ऊसतोडीसाठी टोळ्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यावेळी शेतात जाण्यासाठी रस्त्याची अडचण असल्याने त्यांना रस्ता करून देण्यास सांगितले. परंतु, त्यांनी रस्त्याची सोय न करता उलट कामगार व कर्मचाऱ्यांनाच अरेरावी केली. शुक्रवारीही त्यांनी इतरांसोबत येऊन कार्यालयातील कर्मचारी पडवळ यांना मारहाण केली, साहित्याची फेकाफेकी केली. त्यानंतर विष पिण्याचा प्रयत्न केला. 
- नाना शिंदे, जनसंपर्क अधिकारी, डॉ. आंबेडकर साखर कारखाना.

बातम्या आणखी आहेत...