आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अायसीटीसाठी चारशे कोटींचा निधी; शैक्षणिक वर्षात सुरू होणार प्रवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जालना शहराला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणाऱ्या प्रस्तावित रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी राज्य सरकारने चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता येत्या ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार दानवे यांनी दिली. विशेष म्हणजे या संस्थेत येत्या शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश सुरू होणार आहेत. 


जालन्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासोबतच येथे चांगल्या दर्जाच्या उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) जालना शहरासाठी मंजूर करून आणली होती. त्यानंतर जालना शहरापासून जवळच असलेल्या सिरसवाडी शिवारात या संस्थेसाठी दोनशे एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी जालना शहरात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवंेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेकडे ही जागा सुपूर्द करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संस्थेसाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खासदार दानवे यांनी सांगितले. आता हा निधी मिळाल्याने हा परिसर विकसित करण्यासाठी तातडीने काम सुरू केले जाणार आहे. हा संपूर्ण परिसर विकसित करण्यासाठी मोठा कालावधी लागणार असला तरी येत्या शैक्षणिक वर्षात खासगी किंवा सरकारी इमारत भाडेतत्त्वावर घेऊन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू केले जाणार आहेत. 


चार दिवसांपूर्वीच जालना शहरापासून जवळच असलेल्या खरपुडी येथे सिडको प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. त्यापाठोपाठ आता आयसीटीसाठी निधीची घोषणा करण्यात आल्याने जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. 


अशी आहे आयसीटी टेक्नॉलॉजी संस्था 
मुंबई येथे १९३३ मध्ये रसायन तंत्रज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात आली. या संस्थेने १९ पद्मभूषण, ५०० मोठे उद्योजक दिले. मुकेश अंबानींसारखे उद्योजक हे या संस्थेचे विद्यार्थी आहेत. या संस्थेत विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश असून देशभरातून जवळपास ५०० विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी जालना शहरात येतील. 


जालना शहरात चौथा मोठा प्रकल्प 
शहरापासून जवळच असलेल्या दरेगाव शिवारात १८५ हेक्टरवर देशातील पहिला ड्रायपोर्ट साकारला जातो आहे. त्याशिवाय सीड पार्कसाठी दोनशे एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. खरपुडी येथे ६५० हेक्टरवर साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून सिडको प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. आयसीटीची मुंबईनंतर देशात जालना येथेच शाखा असणार आहे. 


मराठवाड्यासाठी मोठी उपलब्धी असणार 
देशातील नामवंत उद्योजक या संस्थेचे विद्यार्थी आहेत. शैक्षणिक वर्षापासून ही संस्था येथे सुरू होणे अभिमानाची बाब आहे. देशपातळीवर प्रवेश परीक्षा होईल. ही संस्था आपल्या भागात आल्यान दर्जेदार शिक्षणाचे वातावरण होईल. विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे आहे. 
- रावसाहेब दानवे, खासदार, प्रदेशाध्यक्ष, भाजप


साशंकता झाली दूर 
सरकारने वर्षभरापूर्वी या संस्थेची घोषणा केली हाेती. त्यानंतर जागा हस्तांतरित करून सहा महिने झाल्यानंतरही सरकारकडून या संस्थेसाठी निधी मंजूर करण्यात आला नव्हता. अर्थसंकल्पातही तशी तरतूद न करण्यात आल्याने ही संस्था या शैक्षणिक वर्षात सुरू होईल किंवा नाही याबाबत साशंकता होती. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी शहरातील एका शिष्टमंडळाने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन या संस्थेसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी निधीची तरतूद करण्यात आल्याने आता ही संस्था सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


फाइल क्लियर झाली 
आयसीटी ला निधी देण्याचा प्रस्ताव सोमवारी पूर्ण झाला. मंगळवारी तो मंत्रीमंडळासमोर ठेवला जाईल. व या संस्थेसाठी निधी दिला जाणार आहे. आता लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिव्य मराठी शी बोलताना सांगीतले. 

बातम्या आणखी आहेत...