आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमीचा वाद, 24 तासांनंतर महिलेवर अंत्यसंस्कार;6 महिन्यांतील दुसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा वाद न मिटल्याने तालुक्यातील बोराळा येथे रविवारी दुपारी २ वाजता मृत्यू पावलेल्या महिलेवर २४ तासानंतरही अंत्यसंस्कार झाले नाहीत. तर गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. 

 

बोराळा येथील कल्पना गौतम वाढवे (३०) या महिलेचा आजारामुळे रविवारी दुपारी २ वाजता मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे दुःख असतानाच, अंत्यसंस्कार करण्यापूर्वी स्मशानभूमी प्रकरणाचा वाद उभा राहणार या विचारानेच कुटुंबीयांच्या काळजात धस्स झाले आणि झालेही तसेच. ज्या ठिकाणी बौद्ध समाजाचे गेल्या ५० वर्षांपासून अंत्यविधी होत असत त्या ठिकाणी हा अंत्यविधी करण्यासाठी संबंधित शेतमालकाने प्रतिबंध केला आणि प्रकरण चांगलेच चिघळले.

 

अंत्यविधीसाठी सर्व सगेसोयरे आले. परंतु दुपारचे १२ वाजले,  २ वाजले तरीही अंत्यसंस्कार काही झाले नाहीत. त्यामुळे काही नातेवाइक निघून  गेले. मात्र वाद काही संपत नसल्याने, तहसीलदार गजानन शिंदे, ग्रामीण ठाण्याचे पीआय जगदीश भंडरवार हे दाखल झाले. तरीही दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दुपारी ३.३० वाजेपर्यंत हा प्रश्न कायम होता. विशेष म्हणजे गावात बौद्ध समाजाची दुसरी एक स्मशानभूमी आहे. परंतु या ठिकाणी जाण्यासाठी गावातील गल्लीबोळातून लहान रस्ते आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधी न करण्याचा आणि जुन्या ठिकाणीच अंत्यविधी करण्याचा निर्णय बौद्ध समाजाच्या वतीने घेण्यात आला. 

 

अखेर शेतात अंत्यसंस्कार
दुपारी ३.३० वाजता तहसीलदार शिंदे यांनी जुन्या स्मशानभूमीच्या वादात लवकरात लवकर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने, गावापासून अर्धा किमी अंतरावरील स्वतःच्या  शेतात अंत्यविधी करण्याचा निर्णय मयताच्या नातेवाइकांनी घेतल्याने प्रकरण निवळले. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी पुढील तयारी सुरू झाली.  गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी घटना असून यापूर्वी एका महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी विरोध झाल्याने, असाच वाद वाढला आणि शेवटी अंत्यविधी शेतातच करण्यात आला होता.

 

काय आहे वाद 
मराठा समाजाला मिळालेली स्मशानभूमी ही ग्रामपंचायतीची असल्याने ती सार्वजनिक आहे.  त्यामुळे याठिकाणी पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी देण्याची मागणीही बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांकडे करण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी तणाव वाढला. स्मशानभूमी ग्रामपंचायतची असल्याने सर्व समाजातील लोकांना तेथे मृतांवर अंत्यसंस्कार  करण्याचा अधिकार असल्याचा दावा मृताच्या नातेवाइकांनी केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...