Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Google bhashantar Dindi

गुगल भाषांतर दिंडीमुळे 6 दिवसांत 50 हजार भाषांतर व प्रमाणीकरण!

अनंत वैद्य | Update - Jan 08, 2018, 07:09 AM IST

‘मराठी रिट्विट’ आणि ‘आजचा शब्द’ या दोन ट्विटर हॅँडलच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘गुगल भाषांतर दिंडी २०१८’ला संपूर्ण जग

 • Google bhashantar Dindi

  बीड- ‘मराठी रिट्विट’ आणि ‘आजचा शब्द’ या दोन ट्विटर हॅँडलच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘गुगल भाषांतर दिंडी २०१८’ला संपूर्ण जगभरात विखुरलेल्या मराठी ट्विटरकरांचा प्रतिसाद मिळत आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आंतरजालावर ‘मराठी’ला समृद्ध करण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या या भाषांतर दिंडींमुळे सहा दिवसांत ५० हजार भाषांतर व प्रमाणीकरणांची नोंद झाली आहे.


  राज्य शासनाच्या वतीने १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. इंग्रजीच्या भरभराटीच्या काळात ‘माय मराठी’ही समृद्ध होत राहावी, या उद्देशाने या पंधरवड्यात राज्यभर विविध पूरक उपक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या ‘आंतरजालावर’ही मराठीचा विकास व्हावा, यासाठी मराठी ट्विट (@marathirt), आजचा शब्द (@marathiword) या दोन ट्विटर हँडलने ‘गुगल भाषांतर दिंडी २०१८’ ही अभिनव मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सहभागी होत ट्विटरकऱ्यांनी गुगलचा क्राऊडसोर्स हा अनुप्रयोग वापरत इंग्रजी शब्द, वाक्याला मराठी प्रतिशब्द, वाक्य सुचवायचे आहेत. लोकसंख्येचा मोठा घटक आज आंतरजाल आणि समाज माध्यमांशी जोडला आहे. याचा वापर करत स्पर्धेच्या युगात जागतिक स्तरावर ‘माय मराठी’लाही अच्छे दिन यावेत, आंतरजालावरील मराठीचा वापर वाढावा, या उद्देशाने आयोजित गुगल भाषांतर दिंडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत सामान्य ट्विटरकरांसह अनेक सेलिब्रिटीही आपापल्या परीने योगदान देत असून परिणामस्वरूप एक ते सहा जानेवारी या कालावधीत ५० हजार भाषांतर व प्रमाणीकरणांची नोंद गुगलवर करण्यात आली आहे. पंधरवड्याच्या समारोपापर्यंत एक लाख भाषांतर व प्रमाणीकरणांची नोंद करण्याचे उद्दिष्ट या गुगल भाषांतर दिंडीने ठेवले अाहे.


  दिंडीत असे सहभागी व्हा
  आपल्या माेबाइलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन ‘क्राऊडसोर्स’ नावाचे गुगलचा अनुप्रयोग स्थापित करावा. त्यानंतर इंगजी आणि मराठी भाषा पर्याय निवडत नेहमीचे गुगल खाते लॉगिन करावे. त्यानंतर आपल्याला शक्य होईल तितके इंग्रजी शब्द, वाक्ये यांना मराठी पर्यायी शब्द, वाक्ये सुचवावीत. जेणेकरून ‘मराठी’चा मोठा डेटाबेस आंतरजालावर तयार होईल व तो वापरात येईल.


  मराठीचा जागर
  ‘मराठी विश्वपैलू’ या हँडलने गेल्या वर्षी मराठी माणूस जोडा अभियान राबवत ३० हजारांहून अधिक ट्विटरकऱ्यांना मराठी साहित्य, कथा, कविता, प्रवासवर्णने यासह उपयुक्त माहिती देत एकत्र आणले. शिवाय ‘आजचा शब्द’ या हँडलने १६, १७ व १८ फेब्रुवारी २०१८ रोजी तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन आयोजित केले आहे. या उपक्रमांमुळे आंतरजालावर ‘माय मराठी’चा बोलबाला चांगलाच वाढत आहे.

Trending