आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार; पालम ते लोहा मार्गावरील दुर्घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- पालम- ते लोहा या महामार्गावर अंजनवाडी पाटीजवळ सोमवारी (दि.१२) सकाळी अकराच्या सुमारास टेम्पो व दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत पती, पत्नी व  एक मुलगा असे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यातील दोघे जण जागीच ठार झाले तर तिसऱ्या जखमी व्यक्तीस उपचारासाठी नेताना  वाटेतच मृत्यू झाला.

 
पालम -लोहा राज्य मार्गावरून पूर्णा तालुक्यातील निळा येथील उद्धव बालासाहेब सूर्यवंशी, पत्नी सुनीता उद्धव सूर्यवंशी, दोन मुले गणेश उद्धव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे चौघेजण पालमहून लोह्याकडे मोटरसायकलवरून (क्रमांक एमएच २२- के.५४३९) वरून एका लग्न सोहळ्यासाठी जात होते. ते दुपारी अकराच्या सुमारास अंजनवाडी पाटीजवळ असताना पिकअप टेम्पो ( एम.एच.२६, बी.ई.०९७५) हा  लोह्यावरून पालमकडे येत होता.  अंजनवाडी पाटीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.  या अपघातात उद्धव बालासाहेब सूर्यवंशी (३७), गणेश उद्धव सूर्यवंशी (७) हे बापलेक जागीच ठार झाले तर पत्नी सुनीता उद्धव सूर्यवंशी (३४) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नांदेड येथे उपचारास घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.  तर ज्ञानेश्वर उद्धव सूर्यवंशी (वय नऊ) हा गंभीर जखमी झाला असून जखमीस नांदेड येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने निळा गावावर शोककळा पसरली आहे. 


टेम्पोचालक धडक देऊन पळ काढत असताना त्याला केरवाडी शिवारात काही नागरिकांनी पाठलाग करून पकडले. या वाहन चालकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अपघातातील दोन्हीही वाहने पालम पोलिस स्टेशनला आणून लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...