आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात एकाच दिवशी आठ शेतकऱ्यांची आत्महत्या;दोन दिवसांत बारा शेतकऱ्यांनी संपवले जीवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात औरंगाबाद , जालना जिल्ह्यात प्रत्येकी तीन तर बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.  कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवले. तर तीन शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.


औरंगाबादमध्ये तिघांनी जीवन संपवले
गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील शेतकरी राम सोपान सोनवणे (३३) यांनी शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. राम यांनी शेतीसाठी उसने पैसे घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत पैठण तालुक्यातील आडूळ खुर्दचे सूर्यभान हरिभाऊ भावले ( ४०) यांनी सोमवारी मध्यरात्री विष घेतले. बोंडअळीमुळे त्यांचे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने कन्नड तालुक्यातील आडगाव (जुहुर) येथील अनिल केरुजी सोनवणे (३४) यांनी सोमवारी विष घेतले. त्यांनी एक लाखाचे कर्ज काढले होते. 


बीडमध्ये दोघांनी मृत्यूला कवटाळले
केज तालुक्यातील होळ येथील आबासाहेब गोविंदराव शिंदे (४४) यांनी कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून त्यांनी ९५ हजारांचे कर्ज घेतले होते. दुसऱ्या घटनेत परळी तालुक्यातील सिरसाळा गावात मंगळवारी सकाळी एकनाथ गंगाराम चव्हाण (४५) या शेतकऱ्याने विष घेत जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.


एकाची विहिरीत उडी, दुसऱ्याने पाेलिस ठाण्यात घेतले विष
जालना जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एकट्या जाफराबाद तालुक्यात दोघांनी जीवन संपवले. यात जाफराबाद पोलिस ठाण्यात विष घेतलेल्या साहेबराव एकनाथ मिचके (६५, कुंभारी) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास ठाणे अंमलदार व अन्य ३ ते ४ पोलिस कर्मचारी ठाण्यात बसलेले असताना मिचके तेथे आले. एका पोलिसाचे नाव घेत त्यांनी विषारी औषध प्राशन केले. दुसऱ्या घटनेत बुटखेडा तांड्यावरील (ता. जाफराबाद) आसाराम नंदू पवार (५०) यांनी विहिरीत उडी घेतली. डोलखेडा येथे ऊसतोडीसाठी जातो म्हणून ते  ४ फेब्रुवारीला घरातून ते बाहेर पडले होते. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मौजे वाढोणा शिवारातील पाणीपुरवठ्याच्या सरकारी विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. दोघांच्याही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.  तिसऱ्या घटनेत  जालना तालुक्यातील बाबर पोखरी येथील दिलीप दत्तू पवार (२९) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरातच गळफास घेतला. डोक्यावर असलेले कर्ज आणि नापिकीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...