आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदामाबाहेरील वीज मीटरमध्ये स्पार्क, सिलिंडरही फुटल्याने मायलेकासह भाचा ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टीतील दारूगल्ली भागात शुक्रवारी फटाका गोदामाला आग लागल्यानंतर सिलिंडरच्या स्फोटाने स्लॅबही कोसळला. स्लॅबखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. - Divya Marathi
आष्टीतील दारूगल्ली भागात शुक्रवारी फटाका गोदामाला आग लागल्यानंतर सिलिंडरच्या स्फोटाने स्लॅबही कोसळला. स्लॅबखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.

आष्टी -  फटाक्याच्या गोदामाबाहेरील विजेच्या मीटरमध्ये स्पार्किंग होऊन त्याच्या ठिणग्या फटाक्यावर पडल्याने  गोदामाला आग लागली. या आगीत  मोठा स्फोट होऊन घराचा स्लॅब कोसळला. यामध्ये  एकाच कुटुंबातील माय लेकासह उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या भाच्याचा मृत्यू झाला. ही घटना आष्टी शहरातील दारू गल्ली भागात गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ही  घडली. या घटनेचा महसूल प्रशासनाने पंचनामा केला असून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.  


आष्टी शहरात शोभेची दारू तयार करण्यात येते. या भागाला दारू गल्ली म्हणून ओळखली  जाते. येथील फटाका विक्रेता सर्फराज अल्लाउद्दीन सय्यद हा त्याच्या घरा शेजारील एका  रूममध्ये बसला  होता. तेव्हा गोदामाबाहेरील   विजेच्या मीटर मधून ठिणग्या उडत  असल्याचे पाहून तो गोदामाबाहेरील मीटर पाहण्यासाठी गेला असता तेवढ्यात विजेच्या ठिणग्या फटाक्यावर पडून आग लागली. सुरुवातीला फटाके  वाजू लागले. त्यानंतर पाच मिनिटातच मोठा स्फोट झाला. या स्फोटात  दारूचा साठा असलेल्या  खोलीचा स्लॅब  अचानक कोसळला.मोठा आवाज आणि धुराचे लोट बाहेर येत असल्याने  परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.  वाढलेली आग पाहून सुरुवातीला एक हजार लिटर व   त्यानंतर सहा लिटर  क्षमतेचे टँकर आणून आग विझवण्यात आली. आग  विझवत असताना येथील  नगरसेवक शेख शरीफ यांना सर्फराज अल्लाउद्दीन सय्यद याचा मृतदेह आढळला. तो जमावाने बाहेर काढला. परंतु आतमध्ये अजून दोन जण असल्याचे  गर्दीतील लोकांनी सांगितले. 

 

 स्लॅब खाेलीतील दोन मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आली. तोपर्यंत फरजाना अल्लाउद्दीन सय्यद यांचा मृतदेह जमावाने बाहेर काढला.  आष्टीच्या तहसीलदारांनी घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.

 

३० वर्षांपूर्वी स्फोट झाला होता
दारू गल्ली येथे ३० वर्षापूर्वी अशाच प्रकारे फटाक्यांचा स्फोट झाला होता. त्यातही चार जणांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती दारू गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक जनाबाई लोखंडी यांनी दिली.

 

भाचा सहा दिवसांपूर्वीच  आला होता  
आष्टी येथील दारू गल्लीतील फटाका विक्रेता   सर्फराज सय्यद याच्या  कुटुंबात ३० वर्षापासून फटाके विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. सर्फराज याचे वडील अल्लाउद्दीन यांचा दोन वर्षापूर्वी हृदय विकाराने मृत्यू झाला होता. घरी आई फरजाना, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाची सर्व जिम्मेदारी सर्फराज याच्यावर होती.  त्याच भाचा फैजल हा नगर येथून सहा दिवसापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामा सर्फराज यांच्या घरी आला होता.  

 

मीटरवर लोड आल्याने स्पार्किंग
संबधित घटनास्थळावरील वीज मीटरचा प्रॅक्टिकल लोड किती आहे हे पहावे लागेल, त्या ठिकाणची वायरिंग,आर्थिंग कशी आहे. याची पाहणी करू  जर जास्तीचा लोड येत असेल तर प्लस मायनस होवून वीज मीटरमध्ये स्पार्कींग होते. शनिवारी आम्ही भेट देवून पाहणी करणार आहोत
आर.एस.काळे,सहायक विद्युत निरीक्षक , बीड

 

कुटुंबाला आर्थिक मदत देऊ  
या आगीच्या घटनेचा पंचनामा केला असून या बाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात येईल.
- प्रदीप पांडूळे, नायब तहसीलदार, आष्टी  

 

गोदामाचा परवाना नोंदणीकृत  
अशा प्रकारच्या गोदामात फटाके साठवून ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवाना देण्यात येतो. सर्फराज याचा गोदामाचा परवाना नोंदणीकृत होता. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
- डॉ.अभिजित पाटील, पोलिस उपअधीक्षक, आष्टी

 

 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...