आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड- आपण ज्या वेळी दुसऱ्याला मदत करतो, तेव्हा वेगवेगळ्या रूपात आपल्याला देव मदत करत असतो. आमच्यावर अनेक हल्ले झाले, अनेक अपघात झाले. समाजाने आणि नातेवाइकांनी वाळीत टाकले. खोट्या पोलिस केसेसही झाल्या. पण एचआयव्ही बाधित निरागस चिमुकली मुले आम्हाला लढण्याचे बळ देत होती, असा प्रेरणादायी प्रवास समाजसेवक दत्ताभाऊ व संध्याताई बारगजे दांपत्याने उलगडला. अंबड शहरातील पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात समाजभान टीमच्या वतीने माँ जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बारगजे दांपत्याची प्रकट मुलाखत घेण्यात आली. याप्रसंगी आपल्या आयुष्यातील खडतर प्रवास सांगत त्यांनी उपस्थितांच्या अंगावर कधी शहारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणले.
सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन समर्पण वृत्तीने एड्ससह जगणाऱ्या उपेक्षित मुलांचे पालकत्व स्वीकारणे तितकेसे सोपे नव्हते, पण आनंदवनाचा सहवास लाभला आणि दत्ताभाऊंच्या जगण्याचा मार्गच बदलला. बाबा आमटे व प्रकाश आमटे यांच्या सहवासाने जीवनात परिवर्तन घडल्याची भावना या दांपत्याने बोलून दाखवली. दादासाहेब थेटे, प्रा. मारुती घुगे व प्रा. विद्या दिवटे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य चितांबर मेटकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संत रामदास महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष जाधव, विजय बनसोडे, निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत दिलपाक, प्रा. ज्ञानेश्वर उबाळे, प्रा. विद्या दिवटे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन अशोक शिंदे तर आभार श्याम राऊत यांनी मानले.
‘ती’ मुले वृक्षाच्या रूपात बघतोय
बीडजवळील पाली घाटातील आनंदवनमध्ये एचआयव्हीबाधित ६४ मुले-मुली आहेत. काही प्रमाणात सोयी-सुविधा झाल्या. पण पूर्वी पाणी आणायलाही ३ किलोमीटर डोंगर चढून पायपीट करावी लागायची. मुलांची तब्येत ढासळली की त्यांना कधी झोळी करून तर कधी खांद्यावर उचलून दवाखाना गाठावा लागायचा. एवढे सगळे करून कधीच थकवा जाणवला नाही. एकदा डोंगरावरून खाली पडल्याने आपल्या कमरेचे हाड मोडले तरीही त्याचा कधी त्रास जाणवला नाही. अनेक मुले ज्या मांडीवर वाढत होती, त्याच मांडीवर काही जण शेवटचा श्वासही सोडत होती. डोळ्यातले पाणी थिजवून घेण्यापलीकडे आमच्याकडे दुसरा काहीच उपाय नव्हता. अशा वेदना घेऊनही आनंदवन आजही फुलतंय. या मुलांना हक्काचं घर मिळालं, आम्ही आमचं जग जिंकलं. जी सोडून गेली ती या स्मृतिवनात दफनभूमीत दफन करून तेथे वृक्ष लावल्याने ती वृक्षाच्या रूपात अजूनही जिवंत आहेत, असेही दत्ताभाऊ व संध्याताई बारगजे यांनी सांगितले.
बारगजे दांपत्याने उलगडला जीवनप्रवास
नवीन खेळणी तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असतील, पण तुमच्याकडची जुनी खेळणीही आमच्या आनंदवनातील बालकांना आनंद देतील. जुनी कपडे, चपल, बूट त्यांना आधार देतील. तुमची मदत या मुलांच्या आयुष्यात आनंद फुलवेल, त्यामुळे तुम्ही मदत कराल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. प्रकट शब्दांनी भरलेली मुलाखत ऐकून सभागृह अगदी स्तब्ध झाले होते. मन सुन्न झाले होते. जगण्याचे नवीन धागे सापडत होते. दत्ताभाऊ आणि संध्याताई जगण्यासाठी नवा मार्ग - नवी प्रेरणा देत होत्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.