आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा मर्यादा 5 लाख केल्याने राज्यात 4 लाख रुग्णांना लाभ;वर्षाकाठी 3 लाख रुग्णांना फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- केंद्रीय अर्थसंकल्पात जन आरोग्य योजना शासनाने जाहीर केली आहे. वर्षाकाठी प्रतिकुटुंब ५ लाख रुपयांचा विमा यात प्रस्तावित आहे. महाराष्ट्रात २०१२ पासून सुरू असलेल्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची खर्चाची मर्यादा दीड लाख रुपये आहे. फुले योजनेचा वर्षाकाठी राज्यातील ३ लाख रुग्णांना फायदा होत आहे. केंद्राने जाहीर केलेल्या योजनेत विमा मर्यादा ५ लाख रुपये असल्याने महाराष्ट्रातील ४ लाख नागरिकांना दरवर्षी या योजनेचा लाभ मिळेल असा अंदाज आहे.


महाराष्ट्रात आघाडी सरकारने २ जुलै २०१२ रोजी राजीव गांधी आरोग्य योजना सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ जिल्ह्यांत ही योजना राबवण्यात आली होती. २१ नाेव्हेंबर २०१३ रोजी अन्य २८ जिल्ह्यात योजना सुरू करण्यात आली. तद्नंतर योजनेचे नाव महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, असे करण्यात आले. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ घेता येतो. कुटंुबातील एकूण व्यक्तीवर वर्षभरात दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जातात.

 

योजनेत हृदयविकारापासून बालकांच्या आरोग्यापर्यंत सुमारे ९७१ आजारांचा समावेश आहे. तसेच अँजिओग्राफीसारख्या तपासण्याही केल्या जातात. राज्यातील योजनेचे यश लक्षात आल्यानंतर शासनाने यामध्ये काही खासगी रुग्णालयांची संख्याही वाढवली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुसज्ज यंत्रणा असलेल्या ६३६ खासगी आणि सरकारी रुग्णालयात ही योजना कार्यान्वित आहे. योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या उपचाराची रक्कम शासनाकडून संबंधित दवाखान्याला दिली जाते. जुलै २०१२ पासून १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत योजनेवर महाराष्ट्र शासनाने सुमारे ४ हजार ४४ कोटी, ५४ लाख, ८३ हजार, ६९९ रुपये खर्च केले आहेत. या साडेपाच वर्षांच्या काळात राज्यातील १६ लाख ६६ हजार ४४२ रुग्णांवर योजनेतून उपचार करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश आजार अधिक खर्चिक असल्याने प्रत्येक कुटंुबाला या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. आता केंद्र शासनाने आरोग्य योजनेतून प्रतिकुटंुब ५ लाख रुपये विमा देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेली योजना आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना स्वतंत्र असतील की एकत्रित राबवल्या जातील याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. मात्र, या योजनेमुळे वर्षाला उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाखांवर जाईल, असे सूत्रांनी सांगितले.


विदर्भ-मराठवाड्यात शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही लाभ

शासनाने सुरुवातीला केशरी आणि पिवळी शिधापत्रिका असलेल्या कुटंुबांनाच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला होता. मात्र, विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ सुरू केला. ५ ऑक्टोबर २०१५ पासून हा बदल करण्यात आला. त्यामुळे योजनेच्या लाभार्थींमध्ये वाढ झाली आहे.

 

सामान्यांना फायदा  
अत्यंत सामान्य कुटुंबातील रुग्णांजवळ पैसे नसल्याने त्यांना उपचारासाठी अडचणी येत होत्या.  शेतकरी, शेतमजूर, अशा सामान्य रुग्णांना चांगला फायदा होत आहे. योजनेची रक्कम वाढल्यास मोठ्या आजारावरील शस्त्रक्रिया, उपचारही कव्हर होतील. त्यामुळे लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.  
-डॉ. दिग्गज दापके, सह्याद्री हॉस्पिटल, उस्मानाबाद

बातम्या आणखी आहेत...