आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभर रेकी करून सराफा व्यापाऱ्याला लुटले, कोल्हापूरहून टोळीच्या म्होरक्यासह चार अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- महिनाभर रेकी केल्यांनतर  केज तालुक्यातील कुुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या दुचाकीला कारने धडक देऊन मंगळवारी रात्री  पाच  लाखांचे दागिने लुटणाऱ्या चार चोरांपैकी एक विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी रात्रभर सर्च आॅपरेशन केल्याने चार तासांत चार चोर जेरबंद करण्यात आले असून यात चार चोरांपैकी प्रवीण ऊर्फ अमोल संभाजी मोहिते (२६, रा. हरसूल, ता.कागल, जि.कोल्हापूर )हा कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झाल्यानंतर सोनीजवळा येथे राहत होता. तो गोवा येथील आर्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती समोर आली आहे.    


केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी  विकास थोरात यांचे केज शहरात ‘कृष्णाई ज्वेलर्स’ असून मंगळवारी रात्री ते सराफा दुकान बंद करून पाच लाख रुपयांचे  सोन्या-चांदीचे दागिने  एका पिशवीत भरून  दुचाकी (क्रमांक  एम.एच. २३ ए.बी. एम.९९१९) वरून कुंबेफळ गावाकडे निघाले होते. कुंबेफळ शिवारात त्यांची दुचाकी आली तेव्हा कार (क्रमांक  एम.एच. ०९.ए.बी. ६८४७ )  मधील चार चोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. केज - अंबाजोगाई मार्गावरील माऊली जिनिंग समोर थोरात आले असता त्यांना कारने जोराची धडक दिली. 


तेव्हा कारच्या धडकेत व्यापारी थोरात हे रस्त्यावर  पडले यात गंभीर जखमी होऊन  त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चोरांनी  थोरात यांच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन धनेगावकडे  पळ काढला होता.  वाटेत चोरांची कार धनेगावजवळ आल्यानंतर बंद पडली. परिसरातील तरुणांनी अनोळखी कार पाहून त्या चारही जणांची चौकशी केली तेव्हा  एकाने बंदूक दाखवत मारण्याची धमकी दिली. तेवढ्यात जमाव वाढल्याने चोरांनी  पळ काढला.  पळत असतानाच चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांनी त्याला पकडले. अमर लक्ष्मण सुतार (रा.निपाणी, ता. चिकोडी)  अतुल रमेश जोगदंड, महादेव रमेश जोगदंड ( रा.साेनीजवळा, ता. केज )अंधाराचा फायदा घेऊन पसार  झाले.  पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे यांनी तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, युसूफ वडगाव पोलिस, केज पोलिसांसह विशेष पोलिस  यांनी केज तालुक्यात सापळा लावला. तालुक्यात रात्री  पिकांमध्ये जाऊन झडती घेतली.  तेव्हा उसाच्या शेतात लपलेल्या तीन चोरांना पोलिसांनी  पकडले. त्यांच्याकडून कार व पाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी प्रकाश तुकाराम थोरात यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

म्होरक्या कोल्हापूरच्या आर्या गँगचा  
पोलिसांनी पकडलेल्या चार चोरांपैकी प्रवीण ऊर्फ अमोल संभाजी मोहिते (२६, रा. हरसूल, ता.कागल, जि.कोल्हापूर ) हा कोल्हापूर जिल्ह्यातील आर्या गँगचा म्होरक्या  असून तो कागल येथील रहिवासी आहे, तर दुसरा बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील अमर लक्ष्मण सुतार आहे. उर्वरित दोन चोर केज तालुक्यातील सोनीजवळा येथील रहिवासी आहेत. मागील एक महिन्यापासून विकास थोरात यांची हे चारजण रेकी करत होते.  

 

 म्होरक्या प्रवीण मोहितेवर कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे 

आर्या गँगचा म्होरक्या प्रवीण ऊर्फ अमोल संभाजी मोहिते  याच्यावर आजरा, कागल, बसवेश्वर चौक, निपाणी शहर, मुरगुड, जयसिंगपूर ,गडहिंग्लज येथे विविध प्रकारचे २० गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर निपाणी येथील  अमर सुतार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...