आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- शहरातील सावित्रीबाई फुले साहित्यनगरी ( यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ) येथे शनिवारी अाठव्या मराठवाडा लेखिका सािहत्य संमेलनास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, संमेलनाचे उद्घाटन विविध मान्यवरांची भाषणे, परिसंवाद, कविसंमेलन झाले. रात्री सांस्कृितक कार्यक्रमांची साहित्यप्रेमी नागरिकांना मेजवानी मिळाली. तर संमेलनाच्या उद्घाटन साेहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील यांची प्रकर्षाने अनुपस्थिती जाणवली.
उद्घाटन; आम्हाला समान अधिकार मिळत नाही, महिला अद्यापही उपेक्षितच; स्वागताध्यक्षा माजी आ. उषा दराडे यांची खंत
महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही, त्यांना समान अधिकार मिळत नाही. विशेष करून स्वत:कडील साेन्याचा फुटका मनी ही विकता येत नाही, त्यामुळे अाम्ही महिला उपेक्षितच अाहाेत. ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा माजी आ. अॅड. उषा दराडे यांनी आपल्या भाषणात स्त्रीविषयक प्रश्न उपस्थित केले. या वेळी संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, लेखकांनी दर्जा सांभाळत लिखाण करावे, तसेच ग्रामीण स्त्रियांचे अनारोग्य, कुपोषण, सर्व प्रकारचे शोषण, अज्ञान, अंधश्रद्धा यावर लेखन झाले पाहिजे. ग्रामीण मुली का लिहित नाहीत हा चिंतनाचा विषय आहे. या मुलींमध्ये आत्मभान, आत्मविश्वास येण्यासाठी कुटुंब आणि समाज कमी पडतो असे मला वाटते. ग्रामीण स्त्रियांची घुसमट, दबलेला आवाज मराठी साहित्यात येणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
अहिल्याबाई होळकर महिला प्रतिष्ठान आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा प्रारंभ शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. मशाल प्रज्वलित करुन तसेच महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाचे उदघाटन पार पडले. कान्होपात्रा विचार मंचावर संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, आ. अमरसिंह पंडित, प्रकाशक सुमती लांडे, साहित्यिक दिशा शेख, जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बडे, संजीवनी तडेगावकर, बीड शाखेचे प्रमुख डॉ. सतीश साळुंके, प्रा. गणेश मोहिते आदी उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना संमेलनाच्या स्वागताध्यक्षा दराडे म्हणाल्या, अंगावर किलोभर सोनं आहे; परंतु त्यातील फुटका मणी विकण्याची परवानगी महिलांना नाही. समाजात सारेच निराशाजनक चित्र नाही; परंतु सत्य मान्य केलं पाहिजे असं सांगून त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केलं. महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं प्रतिष्ठा मिळायला हवी. महिलांना मागे ठेवून समाजाला आता पुढे जाता येणार नाही. साहित्य संमेलन ही वैचारिक पर्वणी असून महिलांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. मंजुषा दराडे यांनी केले.
साहित्य संमेलनातून स्त्रियांच्या लेखणीला मिळते बळ- संमेलनाध्यक्षा प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर
लेखिका संमेलन स्वतंत्र का घ्यायचे? यासंबंधी प्रश्न निर्माण केले जातात. मला वाटते अशा संमेलनातून नवोदित लेखिकांना व्यक्त होण्याची संधी मिळते. सामाजिक अभिसरणाला चालना मिळते. लेखिका, वाचक, रसिक, अभ्यासक, प्रकाशक, संशोधक यांच्यात सुसंवादाचा पूल बांधला जातो. साहित्य विषयक चर्चा घडते. लेखनाचे प्रेरणास्त्रोत, निर्मितीचे हेतू समजतात. स्त्रियांच्या लेखणीला बळ मिळते. स्त्रिला स्वतःचे मोकळे आकाश गवसते. कधी कधी रूढी पंरपरेच्या बंधनातील स्त्रिया मनाने फुलू शकत नाहीत, व्यक्त होत नाहीत. अशा स्त्रिया लेखिका संमेलनातून मन मोकळे करतात, प्रकट होतात. लेखिका संमेलनातून मनातले ओठात आणण्याचे बळ स्त्रियांना प्राप्त होते.
मराठवाड्यातील स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीतही लेखन करत आहेत. समिक्षकांनी त्यांच्या लेखनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. लेखिका साहित्य व संस्कृती मंडळाची स्वतंत्रपणे स्थापना होणे आवश्यक आहे. साहित्य अकादमीने मराठवाड्यातील लेखिकांच्या गटाला प्रतिवर्षी अभ्यासवृत्ती द्याव्यात त्यामुळे लेखिकांना इतर राज्यातील साहित्य व संस्कृतीचाही परिचय होईल.ज्या स्त्रियांना बालपणापासून घरात शिक्षणास, लेखनास अनुकूल वातावरण मिळते अशा महिला निर्भयपणे लेखन करतात. ज्यांना असे वातावरण मिळाले नाहीत त्या सुचकतेने अनुभव मांडतात.
कवी संमेलन; जहाजा उरीच्या बुडाल्या जरी, मनाचे बिंब पाण्यात पाहू नको
प्रेम, कौटुंबिक विषय, शेती, चूल अन् मुल यासह समाज आणि रोजच्या जगण्यातील अडचणी..स्त्री म्हणून समाजात वावरताना येणाऱ्या रोजच्या अनुभवांचे विश्वच ८ व्या लेखिका साहित्य संमेलनातील कविसंमेलनातून उगडले. स्त्री मनाच्या वेदनेचा हुंकार शब्दबद्ध करुन तो मांडताना ज्येष्ठ कवयित्रींंच्या बरोरच नव्या कवयित्रींनीही छाप पाडली.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी कान्होपात्रा विचार मंचावर श्रद्धा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवयित्रींचे कविसंमेलन पार पडले. मराठवाड्याच्या विविध भागांमधून आलेल्या कवयित्रींनी आपल्या प्रतिभेतून उपस्थितांची वाहवा मिळवतानाच अनेकदा अंतर्मुख होण्यासही भाग पाडले. संमेलनाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी आपल्या आई दिवंगत सुहासीनी इर्लेकर यांची
वेदनेचा वेद माझ्या, यातनांचा यज्ञ रे
मी कधी येऊ दिला ना, पापणीला पूर रे
ही कविता सादर करत वातावरण गंभीर केले. त्यानंतर स्वरचित कवितेतूनही त्यांनी आईचीच आठवण शब्दब्ध केली.
आई आई टाहो फोडत आहे मन
पण कुठूनच तुझी ओ एेकू येत नाही ही कविता त्यांनी सादर केली. रसिका देशमुख यांनी
टाळू वरचे लोणी, गिळू पाहतात लोक
इथे कारणाविनाच छळ पाहतात लोक ही कविता सादर केली. बीडच्याच वैष्णवी पाटांगणकर या नवख्या कवयित्रीने सादर केलेली
मनाच्या कडेला, तळ्याच्या किनारी
तुझे पाश वाळूत रावू नको
जहाजा उरीच्या बुडाल्या जरी या
मनाचे बिंब पाण्यात पाहू नको
ही कविता भाव खाऊन गेली. अनिता मुदखनना, प्रिया धारुरकर, जयश्री पाथ्रीकर, सीमा गुंड, रेखा ढगे, सुरेखा बनकर, अलका टोणगे, सविता बोर्डे, प्रतिभा थिगळे, रेखा मगर, मंगल धुपे, स्वाती काटे यांच्याही कवितांना दाद मिळाली.
‘सेल्फी पाॅइंट’ ठरला आकर्षण
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात लेखिका साहित्य संमेलानानिमित्त ‘सेल्फी पॉइंट ’ तयार करण्यात आला होता. लेखिका साहित्य संमेलनाचा आकर्षक लोगो ,जिल्ह्यातील संस्कृती, साहित्य व ऐतिहासिक ग्रंथांची प्रतिकृतीचा यात समावेश केला होता. या ठिकाणी ‘सेल्फी’ घेण्यासाठी साहित्यप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.
महापुरुषांचे देखावे..
ग्रंथदिंडीत शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारुन शहर वासियांचे लक्ष वेधून घेतले. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे बाबा आदी महापुरुषांची वेशभुषा साकारली होती. हे ग्रंथदिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.
सप्तरंगी रांगाेळीने स्वागत...
मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरामध्ये अॅड. संताेष भिंगारे यांनी १२५ किलाे रांगाेळीद्वारे सप्तरंगी अाकर्षक पाेस्टर रांगाेळी साकारली. अाली. यात पुस्तक प्रिंट पाेस्टरमध्ये उडणारे पक्षी काढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.