आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस; अनेक ठिकाणी सूर्यदर्शन घडलेच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यासह महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी सकाळपासून बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, औरंगाबाद,  जालना येथे दिवसभर ढगांचे आच्छादन होते. काही ठिकाणी पावसाची भुरभुर तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाने गहू,ज्वारी,हरभरा हे पीक आडवे झाले. तर फळबागांचेही मोठे नुकसान होत आहे. 


 परभणीत सूर्यदर्शन नाही
जिल्ह्यात शुक्रवारी सूर्यदर्शन झालेच नाही. पहाटे पाचपासून सुरू झालेली पावसाची  रिपरिप सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.   पहाटे पाच वाजल्यापासून पावसाची भुरभुर सुरू झाली. जिल्ह्याच्या काही भागात तर हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने रस्ते जलमय झाले.   या पावसाचा फटका वीजपुरवठ्याला बसला. काही भागांत सकाळी सहापासून खंडित झालेला वीज पुरवठा सायंकाळी पाचपर्यंत म्हणजे तब्बल ११ तास खंडित  होता.   

 
नांदेडमध्ये हलका पाऊस
नांदेड शहर व परिसरात  शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. दरम्यान, येत्या २४ तासांत मराठवाड्यात गारपीट व अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.   


बीड जिल्ह्यात धारूर, केज चिंब 
जिल्ह्यातील धारूरसह वडवणी व केज तालुक्यात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. धारूरमध्ये आठवडी बाजारात  बाजारकरूंचे  हाल झाले. वडवणीत सकाळी सहापासून पावसाची रिमझिम सुरू होती.   केज परिसरात शुक्रवारी सकाळी व दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. केज तालुक्यात ढगळ वातावरण होते. 


तर दिवसातून तीन वेळा पावसाच्या सरी कोसळल्या.  बीड शहरातही गुरुवारी संध्याकाळी व शुक्रवारी  दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. 


हिंगोली जिल्ह्यात रिमझिम
जिल्ह्यात आज पहाटे २ वाजल्यापासून सुरू झालेला रिमझिम पाऊस सायंकाळी ६ वाजेनंतरही अधूनमधून सुरूच होता.  गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ हवामान होते.   शुक्रवारी पावसाचा जोर नसला तरी वातावरणातील गारव्यामुळे जिल्हा गारठून गेला होता. या पावसामुळे  रब्बी ज्वारी या पिकाचे नुकसान झाले. वादळ व गारपीट नसल्याने फळबागांचे नुकसान  टळले.


औरंगाबादला ढगाळ वातावरण
जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला. पावसाच्या भीतीने  शेतकऱ्यांची काढलेली पिके झाकण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.   पाऊस व गारपिटीची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.  त्यामुळे पिकांची सोंगणी तसेच झाकण्याचे काम वेगात सुरू आहे. 


 लातूरमध्ये ढगांचे आच्छादन 
लातूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. अधून-मधून पडणारे पावसाचे थेंब आणि भरून आलेल्या आभाळामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. 

बातम्या आणखी आहेत...