आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री ही सक्षमच; हक्कासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्षाची गरज; महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड (सावित्रीबाई फुले साहित्यनगरी)- भारतीय स्त्रीला संघर्ष अन् विद्रोहाची परंपरा आहे. समाजव्यवस्थेने स्त्रीवर लादलेली बंधने झुगारून देण्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी इतिहासात स्त्रियांनी  केलेल्या संघर्षाचा धांडोळा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आजची स्त्री सक्षमच आहे; परंतु हक्कासाठी व्यवस्थेविरुद्ध उभे रहावे लागेल असा सूर ‘स्त्री सक्षमीकरणाचा लढा जागतिक आणि भारतीय’ या विषयावरील परिसंवादात उमटला.


कान्होपात्रा विचार मंचावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. सुशीला मोराळे होत्या. स्त्रियांना आपल्या सक्षमीकरणाच्या पाऊलखुणा दाखवायच्या असतील तर त्यांना मोकळा श्वास घेता यावा अशी व्यवस्था रुजवावी लागेल. त्याकरता मानसिकता बदलण्याची गरज आहे. स्त्रियांचे जगणे अन् त्यांचे अस्तित्व समाज मान्य करणार आहे की नाही? असा सवालही परिसंवादात उपस्थित झाला.


महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले; पण स्त्री निवडणूक जिंकली तर मिरवणूक तिची नाही तर तिच्या पती किंवा सासरा यांची निघते. हे तर सरकारी स्त्री सक्षमीकरण असल्याची टीकाही करतानाच स्त्रीवादी असणे काही गैर नाही. महिलांना गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे, असे मत सुशीला मोराळेंनी मांडले.