आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही फक्त साथ द्या, राज्य सरकारला वठणीवर आणतो! अजित पवार यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- राज्य सरकारला सत्तेची नशा चढली आहे .परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे सत्ता येत असते जात असते. आम्ही सत्तेवर असताना आम्हालाही हे माहीत होते. सध्या भाजप गलिच्छ राजकारण  करत आहे.  तुम्ही आम्हाला साथ देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पाहिजे तेवढी किंमत मोजायला तयार असून या सरकारला वठणीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये दिला.  


बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरात हल्लाबोल जाहीर सभेत बुधवारी रात्री पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्ष प्रवक्ते नवाब मलिक, युवा नेते संदीप क्षीरसागर, विद्याताई चव्हाण,आमदार अमरसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार सय्यद सलीम, उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, राजेश टोपे, जीवनराव गोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड आदी उपस्थित होते.  


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की ,नरेंद्र मोदी देशाचा कायापालट करतील असे वाटते होते. परंतु आज साडेतीन वर्षे झाली अच्छे दिन आलेच नाहीत.  राष्ट्रवादी काँग्रेसने आज उठाव केल्याने कर्जमाफीप्रकरणी राज्य सरकारला ऐकावेच लागले. राज्य सरकारवर आज आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असून त्यात चार कोटी रुपयांचे कर्ज पायाभूत सुविधांसाठी सरकारने घेतलेले आहे. एकीकडे आहे त्या रेल्वे व्यवस्थित चालवत नाहीत दुसरीकडे अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनच्या गोष्टी हे सरकार करत आहे. त्या ऐवजी महाराष्ट्रातील फोर लेन, रस्ते चांगले करा, स्वच्छतागृहे उभारा, हे महत्त्वाचे आहे.  कोरेगाव भीमा   प्रकरणातील निर्दोष लोकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची गरज असताना महाराष्ट्रातील जातीय सलोख्याला धक्का लावण्याचे काम हे सरकार करत असून मनुवादी संस्कृतीचे हे सरकार आहे, असेही पवार म्हणाले. 


गडकरीच म्हणतात अच्छे दिन गळ्यातील हाडुक  
अच्छे दिन हे भाजपच्या गळ्यात अडकलेले हाडुक असल्याचे खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच सांगत आहेत. मी म्हणत नाही,  असे  पवार यांनी सांगताच हल्लाबोल सभेत एकच हशा पिकला. सर्व सामान्य माणसाला आज जगणे मुश्कील करून ठेवले आहे  या सरकारने. माजी पंतप्रधान सांगत होते नाेटबंदी करू नका परंतु मोदी सरकारने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे आज विकास दर घटला आहे.नोटबंदीमुळे आज गुंतवणूक करायला कोणी तयार नाही. शेतकरी, व्यापारी त्रस्त आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

 

 ऑनलाइन सरकार ऑफलाइन करण्याची गरज  
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात २००० शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचे जाहीर करण्यात आले .परंतु १२ लोकांनाच एसएमएस आला. त्यामुळे या ऑनलाइन सरकारला आता जनतेनेच ऑफलाइन करण्याची वेळ आली आहे. सरकारने नीट काम करावे अन्यथा ज्या जनतेने तुम्हाला डाेक्यावर घेतले ती जनता तुम्हाला पायाखाली तुडवल्या शिवाय राहणार नाही, असे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...