आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगोदरचा निकाल लागण्यापूर्वीच पुढील सेमिस्टरचे भरून घेतले फॉर्म; विद्यापीठाच्या लहरीपणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- विधी शाखेच्या अगोदरच्या परीक्षेचा निकाल लागण्याअगोदरच पुढील सेमिस्टरच्या परीक्षेचे फॉर्म भरून घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.  निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांना विषयांची निवड करताना गोची झाली. विद्यापीठाच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्काचा फटका बसत असून  त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे.  


वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासाप्रमाणे किचकट, सूक्ष्म व काही संकल्पना अवघड असलेली विधी शाखा आहे. याचे शिक्षण घेतल्यानंतरच वकील, कायदे सल्लागार होता येते. तसेच न्यायालयीन व्यवस्थेमध्ये संधी मिळते. यामुळे विद्यार्थी चांगल्या मानसिकतेमधून विधी शाखेचा अभ्यास होण्यासाठी अाग्रही असतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडत आहे. अभ्यासापेक्षा अधिक त्रास परीक्षा व्यवस्थेमुळे सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूवी ऑनलाइन सीईटी पद्धती लागू केली असली तरी  त्या अगोदरच्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे प्रवेश घेतलेल्या बॅच अजूनही शिक्षण घेत आहेत. यावर्षी या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून अगोदरच्या सेमिस्टरचा निकाल लागण्याअगोदरच पुढील सेमिस्टरचे परीक्षा फॉर्म व परीक्षा शुल्क भरून घेण्यात आले. अगोदरच्या सेमिस्टरचा निकालात कोणत्या विषयांमध्ये उत्तीर्ण आहे, याची माहिती नसताना फाॅर्म भरावे लागले. आता बुधवारी अगोदरच्या सेमिस्टरचा निकाल लागला. यामुळे विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची गोची झाली आहे. त्यांना अतिरिक्त शुल्क तर भरावेच लागेल या शिवाय फॉर्म भरण्यासाठी आणखी पळापळ करावी लागणार आहे. अशी परिस्थिती एलएल. बी. च्या तृतीय तर प्री लॉच्या तिसऱ्या ते पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उद्भवली आहे. 

 

विद्यापीठाने कारभार सुधारावा :  विद्यार्थ्यांची अपेक्षा 
विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या कारभारामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. दोन्ही सेमिस्टरचे फाॅर्म वेगवेगळे भरावे लागणार असून यामुळे अतिरिक्त ११५ रुपयांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी  ८ जानेवारीपर्यंत फॉर्म भरले नसतील तर त्यांना लेट व सुपर लेट शुल्क भरून फॉर्म भरावे लागण्याने आणखी आर्थिक भुर्दंड पडत आहे. नियमित शुल्कातच विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळावी किंवा अतिरिक्त शुल्क आकारू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

युवासेनेचे निवेदन 
युवासेनेचे तालुका सचिव संजय भाेरे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने परीक्षा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी विधी महाविद्यालयातील प्राचार्यांना निवेदन दिले आहे. तसेच महाविद्यालयाने निवेदन विद्यापीठाकडे पाठवले आहे. आता यापुढे तरी विद्यापीठाचा कारभार सुधारेल अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा होत आहे.

 

विद्यापीठाचा नियम 
विद्यापीठाच्या नियम व मार्गदर्शनाप्रमाणे परीक्षेचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. युवासेनेेचे निवेदन विद्यापीठाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. यावर निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. 
- डॉ. बी. एच. चौधरी, प्राचार्य.

बातम्या आणखी आहेत...