आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस जिल्हाध्यक्षांना भाजप खासदार म्हणाले- तिळगूळ घ्या, गोड बोला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणापासून बाजूला असलेल्या व्यंकट बेद्रे यांच्या कार्यालयाला भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी भेट दिली. यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र ही केवळ तिळगूळ भेट होती, असे दोन्ही बाजूंनी सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळी काँग्रेसचे माजी आमदार वैजनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती.  


माजी नगराध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या व्यंकट बेद्रे यांची ओळख दिवंगत विलासराव देशमुख यांचे खंदे कार्यकर्ते अशी आहे. विलासरावांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा अमित देशमुख यांच्याकडे आला. अमित यांनी आपली राजकीय फळी उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, व्यंकट बेद्रे अशी मंडळी काहीशी बाजूला झाली. व्यंकट बेद्रे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते इतर पक्षातही गेले नाहीत आणि काँग्रेसमध्येही सक्रिय राहिले नाहीत. काहीसे अलिप्त असलेल्या बेद्रे यांनी मधल्या काळात माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासोबत व्ही मित्रमंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी शहरातील गाळेधारक आणि मालमत्तावाढीच्या विरोधात आंदोलनही केले. मात्र त्यापलीकडे ते गेले नव्हते. माजी आमदार वैजनाथ शिंदे यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाले नाही. सध्या ते बाजार समितीवर संचालक आहेत. त्यांना सभापती केले जाईल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे तेही सध्या अमित देशमुख यांच्यापासून काहीसे अंतर राखून आहेत. बेद्रे आणि शिंदे यांची मैत्री लातूरमध्ये सर्वश्रूत आहे. त्यातच भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी बुधवारी या दोघांची भेट घेतल्यामुळे लातूरकरांच्या भुवया उंचावल्या. 


बेद्रे अद्यापही जिल्हाध्यक्ष  : व्यंकट बेद्रे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु अशोक चव्हाणांनी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. सध्या तरी  व्यंकट बेद्रे यांचीच कागदोपत्री जिल्हाध्यक्ष म्हणून नोंद आहे. ते काळजीवाहू जिल्हाध्यक्ष आहेत की नाही याबाबत खातरजमा होऊ शकली नाही. मात्र असे असले तरी गेल्या सहा महिन्यांत ते काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात दिसले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पदाविषयी संभ्रम आहे. 

 

मैत्रभाव जपण्यासाठी भेट 
खासदार गायकवाड यांनी ही भेट केवळ संक्रांतीनिमित्त तिळगूळ देण्यापुरतीच मर्यादित होते, असे सांगितले. राजकारणापलीकडे जाऊन मैत्रभाव जपण्याची राजकीय परंपरा लातूरमध्ये आहे. ती आपण पुढे नेत आहोत. त्यामध्ये वावगे काही नाही असा दावाही त्यांनी केला. तर व्यंकट बेद्रे आणि वैजनाथ शिंदे यांनीही ती केवळ सहजपणे झालेली भेट होती असे सांगितले. दोन्ही बाजूंचे दावे काहीही असले तरी यामागे काहीतरी वेगळे शिजतेय अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...