आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या विमुक्त समाजासाठी धोरण तयार करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- विविध कला, संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची आपली जबाबदारी आहे. त्यांच्या कलेला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिले पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या एकंदर प्रश्नांचा विचार करून त्यांच्यासाठी धोरण ठरविण्याचे आश्वासन दिले. भटक्या समाजाच्या स्वतंत्र मंत्रालयाच्या सचिवांना तसे आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.   


तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे भटक्या विमुक्तांच्या सेवालयावर मंगळवारी(दि.१३) भटक्या विमुक्त समाजासाठी घेण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम भटक्या विमुक्त प्रतिष्ठान आणि परिषदेने आयोजित केला होता. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी ऊर्फ सुरेश जोशी, हिंदुत्व अभियानचे प्रणेते लाहिरी गुरुजी,सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुवर्णा रावळ, भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष भिकुजी इदाते, आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, रमेश पतंगे, डॉ.अभय शहापूरकर, सुरेश हावरे आदी उपस्थित होते.   


या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भटके विमुक्त समाजातील विविध कला-गुण, संस्कृतीचे संवर्धन होणार नाही, तोपर्यंत देश सक्षम होणार नाही. म्हणूनच केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने या समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजना समाजापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्यासाठी संस्थांची गरज आहे. कायम स्थलांतर करणाऱ्या या समाजाला मदत पोहोचवण्याचे काम देशप्रेमाची भावना असणाऱ्या आणि ईश्वरी कार्य मानणाऱ्या संस्थाच करू शकतात. या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. ते काम भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान करत आहे. भटक्या समाजाकडे कलांची परंपरा असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

 

भटक्या समाजाचे सशक्तीकरण करा : लाहिरी गुरुजी   
२५ वर्षांच्या तपश्चर्येतून उभारलेली ही संस्था पाहून समाधान वाटले. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा स्नेहमेळावा होत आहे. या मेळाव्यातून आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा संकल्प करूया. मागे राहिलेल्या समाजाला सोबत घेऊन चालण्याची आपली जबाबदारी आहे. रामाने अयोध्येपासून लंकेपर्यंत पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत त्यांनी वनवासी, भटक्या समाजाचे सशक्तीकरण केले. १४ वर्षे वनवास भोगलेल्या रामांनी त्यानंतर रामराज्य निर्माण केले. त्याच रामांची साधना स्मरणात ठेवून, त्यांची प्रेरणा घेऊन आपणी रामाप्रमाणे जीवन व्यतीत करू, तरच रामराज्य येईल, असा विश्वास हिंदुत्व अभियानाचे प्रणेते लाहिरी गुरुजी यांनी व्यक्त केला. 

 

कुलस्वामिनीचे दर्शन    
सकाळी साडेसाठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस सोलापूरमार्गे कारने तुळजापूरला आले. त्यांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासमवेत कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील, देवानंद रोचकरी आदी नेते उपस्थित होते.   


शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ताब्यात   
मुख्यमंत्री यांच्या तुळजापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांना पोलिसांनी रातोरात ताब्यात घेतले. आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई केली. मात्र, या कारवाईबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

व्यासपीठावर संघाचेच प्रतिनिधी   

 

यमगरवाडीत झालेल्या स्नेहमेळाव्यासाठी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यंाच्याव्यतिरिक्त एकाही नेत्याला संधी देण्यात आली नव्हती. सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह आमदार, भाजपचे पदाधिकारी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते. व्यासपीठावर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच पदाधिकारी, प्रतिनिधी यांना संधी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...