आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- उद्योगाच्या रूपातून व्यक्तिगत राजकीय ताकद वाढवण्यासाठी साखर कारखाने हे राजकीय नेत्यांचे महत्त्वाचे साधन. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना आपापल्या मतदारसंघात राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मुंगी (ता.धारूर) येथे तर भाजपचे आमदार लक्ष्मण पवार हे गेवराई येथे खासगी कारखाना उभारणीच्या तयारीला लागले आहेत.
धनंजय मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेला व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. साडेसहा मे.टन उसाचे गाळप करणाऱ्या वैद्यनाथ कारखान्याच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने असलेले ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, ऊसतोड कामगार, मुकादम वर्ग यांच्याशी स्व.गोपीनाथ मुंडेंची नाळ जोडलेली होती. याच बळावर साखरेच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना ते शह देत होते. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बाजी मारत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या पॅनलला धूळ चारली. राजकारणात कारखान्याचे महत्त्व जाणून असलेल्या धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीनंतर वैद्यनाथ कारखान्यापासून साधारण २० किमी अंतरावर असलेल्या मुंगी (ता.धारूर) येथील ‘तासगावकर ग्रुप’चा शिवपार्वती कारखाना ‘टेक ओव्हर’ करत त्याची नव्याने उभारणी सुरू केली आहे. हा कारखाना आगामी गळीत हंगामापर्यंत सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे येत्या काळात मुंडे बंधू-भगिनीत उसाचे राजकारण पाहायला मिळणार आहे. शिवाय विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असताना कारखान्याच्या रूपातून आणखी एक सत्ताकेंद्र निर्माण करण्याच्या प्रयत्नात धनंजय मुंडे आहेत. आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांत साखरेवरूनही कटुता निर्माण होणार आहे.
गोड उसामुळे राजकीय कटुता
सन २०११ पासून सहा वर्षे अवर्षणाचा सामना केल्यानंतर जिल्ह्यात सन २०१७ मध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे गेवराई असो की परळी, जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. धनंजय मुंडे, लक्ष्मण पवार यांचे कारखाने आगामी गळीत हंगामापर्यंत सुरू झाले तर उसामुळे राजकीय कटुता निर्माण होणार हे निश्चित आहे.
पंडितांविरुद्ध पवारांची रणनीती
गेवराई मतदारसंघातील गढी येथील विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांच्या ताब्यातील जयभवानी सहकारी कारखाना तीन वर्षे बंद राहिल्यानंतर यंदा सुरू झाला आहे. जुलै २०१७ मध्ये या कारखान्याच्या निवडणुकीत गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी पॅनल उभे केले होते. परंतु त्यांचे सर्व उमेदवार निवडणुकीपूर्वीच बाद ठरले. आता ऊस क्षेत्र वाढलेले असताना राजकीय वर्चस्वासाठी कारखान्याला महत्त्व अाले असल्याने आमदार लक्ष्मण पवार यांनीही गेवराईत खासगी साखर कारखाना उभारण्याचा हालचालींना वेग दिला आहे. दोन दिवसांपूर्वी गेवराईत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कारखाना उभारत ‘जयभवानी’च्या जाचातून ऊस उत्पादकांना मुक्त करणार असल्याची घोषणाही केली आहे.
जिल्ह्यात सद्या सात कारखाने सुरू
बीड जिल्ह्यातील दहा कारखान्यांपैकी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ, रमेश आडसकरांचा अंबा साखर कारखाना, मोहनराव जगताप यांचा छत्रपती कारखाना, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंकेंचा लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना, आमदार अमरसिंह पंडित यांचा जयभवानी हे पाच सहकारी कारखाने तर माजलगावचा जय महेश शुगर व केजचा येडेश्वरी अॅग्रो हे दोन खासगी कारखाने सुरू आहेत.
कागदपत्रांची जुळवणी अंतिम टप्प्यात
कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर स्थळ निश्चिती व सर्व कागदपत्रांची जुळवणी सुरू आहे. गेवराई मतदारसंघातील ऊस उत्पादकांच्या उसाला आज योग्य भाव मिळत नाही. त्यासाठी शासन व कोर्टाच्या निर्देशांचे पालन करत पंकजा मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली दीड ते दोन वर्षांत खासगी साखर कारखाना सुरू केला जाणार आहे.
- लक्ष्मण पवार, आमदार, गेवराई.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.