आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्विंटलमागे 5 किलाेंचा फटका,गोदामकीपरच्या आदेशाने क्विंटलमागे घेतली किलोभर तूर जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- माजलगाव येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावरच्या मापांमध्ये पाप करून क्विंटलमागे शेतकऱ्यांकडून चार किलो जास्तीची तूर घेण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी “दिव्य मराठी’ने समोर आणल्यानंतर उडालेली खळबळ थांबत नाही ताेच शुक्रवारी नवा प्रकार समोर आला आहे. गोडाऊन किपरच्या आदेशाने क्विंटलमागे शेकतकऱ्यांकडून एक किलो तूर जास्त घेण्यात येत आहे. केंद्र सुरु झाल्यापासून २२ दिवस हा प्रकार सुरू होता. दरम्यान, वजनात तफावत असल्याची बातमी “दिव्य मराठी’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध करताच शेतकऱ्यांसह बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींनी वजन काटे बदलले तर क्विंटलमागे एक किलो जादा तूर घेणेही बंद करण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत मात्र शेतकऱ्यांना क्विंटलमागे पाच किलोंचा फटका बसला आहे. 


माजलगावमध्ये नाफेडमार्फत एक फेब्रुवारीपासून बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला हेक्टरी केवळ ३ क्विंटल तूर खरेदीचे आदेश असल्याने गोंधळ उडाला होता. दरम्यान, यानंतर शासनाने सुधारीत आदेश काढून हेक्टरी आठ क्विंटल तूर खरेदीचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केंद्रावर गर्दी केली आहे. केंद्रावर मोठी आवक आहे. तूर खरेदीदरम्यान वजन काट्यांमध्ये तफावत असल्याने याचा शेतकऱ्यांना फटका बसत होता. क्विंटलमागे ४ किलोंचा बसणाऱ्या फटक्याचा भांडाफोड गुरुवारी झाल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने शुक्रवारी कारवाईचे संकेत दिले. तर दुसरीकडे नवा प्रकार शुक्रवारी समोर आला. गाेडाऊन किपरच्या तोंडी आदेशाने २२ दिवसांपासून प्रति क्विंटल एक किलो अधिक तूर शेतकऱ्यांकडून घेण्यात येत होती. त्यामुळे २२ दिवस शेतकऱ्यांना क्विंटलमागे पाच किलोंना चुना लागला आहे.

 

गोदामकीपरचे तोंडी आदेश 
शासकीय गोडाऊनच्या कीपरने आम्हाला क्विंटल मागे १ किलो तूर जादा तूर घेण्याचे सांगितल्यानुसार काट्याचे वजन सोडून एक किलो जादा तूर आतापर्यंत घेतली आहे. मात्र  आजपासून जादा तूर घेणे बंद करण्यात आले आहे. 
-  ए.एस पांडे, व्यवस्थापक ख.वि. संघ 

 

प्रकरणाची चौकशी करू 
माजलगाव येथे पन्नास किलो काट्यात जर खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांचे तुरीचे माप घेताना जादा तूर घेत असतील तर हा गैरप्रकार आहे.  जादा तूर घेण्याचे कुठलेही आदेश माझ्या स्तरावरुन देण्यात आलेले नाहीत.  या प्रकरणाची लवकरच करण्यात येईल. तसेच या चौकशी जर कोणी दोषी आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करू. 
-एस. के. पांडव, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाफेड

 

तूर खरेदी केंद्राशी बाजार समितीचा संबंध नाही  
बाजार समितीच्या आवारात सध्या सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्राशी बाजार समितीचा कसलाही संबध नाही.  खरेदी विक्री संघाच्या मार्फत सध्या तूर खरेदी केंद्र सुरू आहे. काट्याबाबत बाजार समितीचा कसलाही संबंध नसून पूर्ण जबाबदारी खरेदी विक्री संघाची आहे.
-  अशोक डक, सभापती, बाजार समिती

 

२२ दिवसांत ५५१३ क्विंटल खरेदी 
१ फेब्रुवारीपासून केंद्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत  ४९१ शेतकऱ्यांची ५ हजार ५१३ क्विंटल तूर  पाच काट्यावर खरेदी करण्यात आली आहे. रोज २० ते २५ शेतकऱ्यांच्या नोंदी होतात. त्याप्रमाणे तूर खरेदी केली जात आहे.

 

दोन काटे बंद 
दरम्यान, वजन काट्यांमधील तफावतीची बातमी ‘दिव्य मराठी’त प्रकाशित होताच शुक्रवारी बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे, उपसभापती निळकंठ भोसले यांनी तूर खरेदी केंद्राची पाहणी केली. यावेळी क्विंटलमागे ४ किलो तूर कमी भरत असल्याचे दिसून आले. तफावत असलेले वजन काटे बंद करून नवे काटे आल्याशिवाय तूर खरेदी करू नका अशा सूचना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक ए. एस. पांडे यांना दिल्या. 

 

लुटीची रक्कम द्या 
वजन काट्यातील तफावतीमुळे क्विंटलमागे ५ किलोंची लूट  करण्यात आली.  आतापर्यंत तूर विकलेल्या शेतकऱ्यांना लुटीची ही रक्कम परत द्यावी अन्यथा पणन संचालकांकडे तक्रार करणार आहोत.       
-नितिन नाईकनवरे, तज्ञ संचालक 

बातम्या आणखी आहेत...