आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाला आरक्षण हवे तर सरकारवर दबाव वाढवा; राम शिंदे यांचा अजब सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 लातूर-  राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत.  पण धनगर  समाजबांधवांनी आरक्षण व समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगी बोलताना केले. या साहित्य संमेलनाचे उद््घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संगीता धायगुडे या होत्या.   


लातूरच्या टाऊन हॉलच्या प्रांगणावर उभारण्यात आलेल्या महाराजा यशवंतराव होळकर साहित्यनगरीमध्ये धनगर साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद‌्घाटनप्रसंगी खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या  शेंडगे, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले,  संमेलनाचे  स्वागताध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील,  प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संयोजक प्रा. सुभाष भिंगे आदींची उपस्थिती होती. या वेळी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाज साहित्य क्षेत्राशी जोडला गेला असल्याचे सांगितले.प्रास्तविक प्रा. सुभाष भिंगे यांनी केले. 

 

संस्कृतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न 
साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय सोनवणी यांनी सांगितले, अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बिघडत चाललेल्या संस्कृतीला सुधारण्याचा प्रयत्न व्हावा. या संमेलनाच्या माध्यमातून मिळणारी पुरस्काराची एक लाखाची रक्कम धनगर समाज संदर्भ ग्रंथ डिजिटल स्वरूपात आणण्यासाठी खर्च करणार आहे.

 

साहित्यिकांना असायचे सहकार्य
संमेलनाचे उद‌्घाटक म्हणून बोलताना ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी आपल्या मार्गदर्शनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर यांनी तत्कालीन साहित्यिकांना आपले कर्तव्य समजून सर्वतोपरी सहकार्य केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. आजघडीला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी निर्माण करा, त्यांच्या कृषी मालाला चांगला भाव निश्चित करून द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे  सांगून पाण्याच्या क्षेत्रात सगळ्यात मोठे, महान कार्य अहिल्यादेवी होळकरांनी दूरदृष्टी ठेवून केले होते. साहित्यिकांना सहकार्य करण्याची परंपरा अहिल्यादेवी होळकर, यशवंतराव होळकर, शिवाजी महाराजांनीही कायम जोपासली, असेही महानोर यांनी सांगितले.

 

महानोरांचा गौरव

ना. धों. महानोर यांना  कवी कालिदास जीवनगौरव पुरस्कार, तर संजय सोनवणी यांना राजा हाल सातवाहन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मीना नीळकंठराव आग्रहारकर पाटील, प्रगती खांडेकर, संस्कृती गजेंद्र सोनटक्के, भाऊसाहेब हाके पाटील, डॉ. आर.डी. शेंडगे, श्रीरंग शेवाळे, बाळकृष्ण धायगुडे यांचाही गौरव झाला. 

बातम्या आणखी आहेत...