आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 15 लाख हेक्टरवरील कपाशीचे पंचनामे जीपीएस प्रणालीद्वारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- राज्यभरात ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड होत असते. दरम्यान, विदर्भ व मराठवाड्याचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस या पिकाची तब्बल १५.९२ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट होणार असल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात उघड झाले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने ३३ टक्क्यांच्या वरील नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे घोषित केले आहे. पंचनामे पारदर्शक होण्यासाठी जीपीएस प्रणाली (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) द्वारे पंचनामे होत आहेत.    


मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विविध बियाणे कंपन्यांकडून बोंडअळीपासून ११० दिवस दिवस संरक्षण मिळेल, असा दावा कंपन्यांकडून केला गेला. परंतु आता झालेल्या घटीवरून नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलनेही झाली. या आंदोलनांची दाहकता लक्षात घेत प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार राज्यभरात कृषी, महसूल विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या दृष्टीने जिल्हा, तालुका, गाव पातळीवर पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान, पंचनामे पारदर्शक व्हावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 

 

काय आहे जीपीएस यंत्रणा    
अंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातले बदल तपासणे यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या ठिकाणच्या पिकांचे फोटो, व्हिडिआे तयार केले जात आहेत. या प्रणालीमुळे पंचनामे पारदर्शक होत आहेत. यामुळे खरोखर नुकसान झालेल्यांनाच लाभ मिळेल. 

 

जालना जिल्ह्यात १६ पथके    
बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी १५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. गाव पातळीवरील कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह महसूल विभागाच्या विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हे पंचनामे केले जात आहेत. यात सर्वांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत. या जीपीएसआधारेच ही तपासणी होत आहे.    

 

दहा दिवसांत अहवाल द्या   
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार ४ डिसेंबरच्या दिवसापासून १५ डिसेंबरपर्यंतच्या दहा दिवसांत पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात सहा दिवस उलटले आहेत. यात अजूनही अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पंचनामे सुरू न झाल्यामुळे दहा दिवसांच्या मुदतीत पंचनामे होतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. 

 

२२ हजार ४५१ हेक्टर बाधित क्षेत्र

जालना जिल्ह्यात २२ हजार ४५१ हेक्टर क्षेत्र झाले बाधित झाले आहे. यानुसार १३ हजार ३३ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. १२३  हेक्टर क्षेत्राची पाहणी- पंचनामे केले. 

बातम्या आणखी आहेत...