आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीकृष्ण पाठीशी नाही तर धनुष्यबाण काय हाती घेणार? खासदार दानवेंचा खोतकर यांना टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- सध्या लोकसभा निवडणुकीचे काही लोकांना डोहाळे लागले आहेत. त्यामुळे ते महाभारताचे दाखले देऊन मनात येईल ते बोलत आहेत. मात्र ज्यांच्या पाठीशी श्रीकृष्ण नाही व पेंदेही नाहीत ते धनुष्यबाण काय हाती घेणार? अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना टोला लगावला. शनिवारी जालना दौऱ्यावर असताना दानवे 'दिव्य मराठी'शी बोलत होते. 


दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी केली. त्याच बैठकीत जालना लोकसभा मतदारसंघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना उमेदवारीचे संकेत मिळाले. त्या वेळी खोतकर यांनी धनुष्यबाण हाती घेतला तर आगामी लोकसभा निवडणुकीत दानवाचा वध होणारच, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान साधले होते. 


शनिवारी खासदार दानवे जालना दौऱ्यावर असताना त्यांनी खोतकर यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. चक्रव्यूह भेदण्यासाठी अगोदर धनुष्यबाण हातात घ्यावा लागतो. शिवाय त्यासाठी पाठीशी श्रीकृष्ण असावा लागतो. त्यांच्या पाठीशी तर श्रीकृष्ण नाहीच, मात्र पेंदेही नाहीत. त्यामुळे ते काय धनुष्यबाण हाती घेणार, असा सवाल खासदार दानवे यांनी खोतकर यांचे नाव न घेता केला. घनसावंगीत एक, जालन्यात दुसरी, तर बदनापुरात तिसरी अशा प्रकारे मतदारसंघ बदलला की त्यांची भूमिका बदलते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. अशा परिस्थितीत ते खरेच हाती धनुष्यबाण घेणार आहेत का, हा प्रश्न असून त्यांचे चिन्ह काेणते असेल हे जनतेला माहीत आहे, अशा शब्दांत दानवे यांनी खोतकर यांच्या वक्तव्यावर टीका केली. 


आपल्याला चिंता नाही 
मंत्री खोतकर लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले तर आपल्याला त्याची चिंता नाही. केंद्र व राज्य सरकारने राज्यभरात विकासकामांचा धडाका लावला. जालना व औरंगाबाद जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे येथील जनता विकासाच्या बाजूने उभी राहणारी असल्याने कोणताही उमेदवार समोर असला तरी आपल्याला काळजी नाही, असे खासदार दानवेंनी सांगितले. 


महाभारताच्या संदर्भाची चर्चा
खोतकर-दानवे यांच्यातील शाब्दिक युद्धात महाभारताची उदाहरणे दिली जात आहेत. यासंदर्भातही सध्या सोशल माध्यमातूनही चर्चा होत आहे. खोतकर समर्थकांनी धनुष्यबाण हाती घेतलेल्या वेशातील अर्जुन खोतकर यांचे चित्र व्हायरल केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...