आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ज्ञानतीर्था’बरोबरच येथे विद्यार्थ्यांना पाजले जाते जगण्याचे बाळकडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- घरातील कर्त्यापुरुषाने आर्थिक विपन्नावस्थेतून जीवन संपवल्यानंतर उघड्यावर येणाऱ्या कुटुंबाचे त्यातही मुलांच्या शिक्षणासह संगोपनाचे प्रश्न गंभीर असतात. या भावी पिढीची मानसिकता बालपणातच वेगळी होऊ नये,  त्यामुळे या मुलांच्या संपूर्ण शिक्षणासह संगोपनाची जबाबदारी  येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेने घेतली. आजमितीला या  संस्थेत अशी ४० मुले शिक्षण घेत आहेत. उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

    
जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय संस्थेचे सचिव प्रा.नितीन लोहट यांच्या संकल्पनेतून राबवला जात असलेला हा उपक्रम त्या मुलांना शिक्षणाचा आधार तर देतच आहे. त्याचबरोबर त्यांना मानसिक व संगोपनाचे संपूर्ण पाठबळ देत असल्याने महाराष्ट्रातील मान्यवरांनी या संस्थेला भेट देत या मुलांसाठी काही ना काही मदत देऊ केली आहे.    

 

मुलांसाठी सर्व काही
या उपक्रमात मुलांच्या संपूर्ण मोफत शिक्षणासह त्यांचे कपडेलत्ते, खानपान, निवास, शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य सुविधा मोफत दिली जाते.  विक्रीकर अधिकारी धनंजय देशमुख यांनी २५ हजार रुपयांची मदत केली तर प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजित भालेराव व त्यांच्या ४० सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मुंबईच्या श्रीमती पुराणिक यांनी दोन गाईंची मदत केली. याशिवाय, मल्हार पाटेकर, मकरंद अनासपुरे, पुरुषोत्तम खेडेकर, आ.बच्चू कडू, कांतराव देशमुखसारख्या मंडळीही या मुलांसाठी संस्थेच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.    


संकल्पाची मुहूर्तमेढ
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा पाहून मार्च २०१५ मध्ये अशा कुटुंबातील पाचवी ते १२ वी पर्यंतच्या मुलांच्या  पालनपोषणाचा संकल्प केला.  प्रथम जिल्हाभरात एस.जी.मेहत्रे व आर.टी.वाघ या दोन शिक्षकांकरवी सर्वेक्षण केले. जिल्हा प्रशासनाकडून यादी मिळवून त्या त्या गावच्या सरपंच व पोलिस पाटलांकडून अशा कुटुंबीयांची माहिती घेतली. यातून दोन वर्षांत ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.  


संवादातून जाणल्या भावना  
पहिल्या वर्षी १८ मुलांना प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करताना प्रथम त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. मानसिकदृष्ट्या खचू लागलेल्या मुलांमध्येही प्रत्येकातच मोठे होण्याची स्वप्ने दिसू लागली. प्रत्येकातील आवडीनिवडी, कला, कौशल्य लक्षात घेऊन संस्थेने त्यांच्या विकासावर भर दिला आहे.     


समाजऋण फेडण्याचेसमाधान : प्रा.नितीन लोहट, सचिव 
शेतकरी कुटुंबातूनच आपण असल्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख आपलेच मानून त्यांच्या पाल्यांना शिक्षण देण्याचा संकल्प केला. समाजाचे ऋण फेडण्याचे समाधान मिळत असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांत खंबीरपणे जीवन जगण्याची उमेद निर्माण झाली आहे. ही मुले भविष्यात चांगल्या पदांवर काम करताना समाजाचे उत्तरदायित्व नक्कीच निभावतील.  


५ विद्यार्थ्यांपासून सुरुवात    
जून २०१५ पासून  उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वर्षात १८ मुले जिजाऊ ज्ञानतीर्थमध्ये दाखल झाली. दुसऱ्या वर्षी  १२ मुलांची भर पडली. तर चालू वर्षी ही संख्या ४० वर पोहोचली आहे. यात ५ वी ते १२ वी पर्यंतच्या मुला मुलींचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...