आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या जलवाहिनीतून पुन्हा गळती; गळती थांबवण्यासाठी अंथरली नवीन जलवाहिनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर शहरातील जुन्या जलवाहिन्यांमधून ५० टक्क्यांहून अधिक गळती होत असल्यामुळे अमृत योजनेतून ४२ कोटी रुपये खर्च करून नवी जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. त्यातील ५० टक्के कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातच जेथे काम झाले त्या नव्या वाहिन्यांनाही गळती लागल्यामुळे कामाचा बोजवारा उडाला आहे.    


लातूर शहराने दोन वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई अनुभवली होती. त्याला शहरातील जुन्या, सडलेल्या, कुजक्या जलवाहिन्याही कारणीभूत होत्या. निजाम काळात जलवाहिन्या अंथरल्यानंतर गावभागात पुन्हा नव्याने वाहिन्या अंथरल्या नव्हत्या, तर गेल्या ४० वर्षांत नव्याने अंथरलेल्या वाहिन्यांनी गळती लागली होती. त्यामुळे शहराच्या गरजेच्या दुप्पट पाणी धरणातून उपसले तरी गरजेच्या निम्मेही पाणी नागरिकांना मिळत नव्हते. ५० टक्क्यांहून अधिक पाणी रस्त्यावर आणि गटारातून वाहून जाते. ही बाब दोन वर्षांपूर्वीच्या भीषण पाणीटंचाईत उघड झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर शहरातील अंतर्गत जलवाहिनीसाठी निधी देण्याची घोषणा केली होती. पुढे अमृत योजनेतून ४२ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. त्यामध्ये शहरात जलवाहिनी अंथरण्याचे काम भाजपाचे जिप सदस्य सुरेश लहाने यांच्याशी संबंधित कंपनीला मिळाले. हे काम १८ महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. त्याची मुदत मार्चअखेर संपणार आहे. मात्र आजघडीला ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

 

त्यामुळे हे काम मुदतीत पूर्ण होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांसारखे यावर्षीही उपसा केलेल्या ५० टक्क्यांहून अधिक पाणी गटारातून वाहून जाण्याचा प्रकार सुरूच राहणार आहे. हे कमी म्हणून की काय अमृत योजनेतून आतापर्यंत जेवढी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे त्या नव्या वाहिनीलाही गळती लागल्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाविषयीच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. याबाबत महापालिकेचे अधिकारी मात्र मौन बाळगून आहेत, तर पदाधिकारीही सगळे काही लवकरच सुरळीत होईल हे पालुपद आळवत आहेत. यापूर्वीचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र ते जाऊन अच्युत हांगे हे नवे आयुक्त आले. त्यांनी या कामाचा आढावा घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे सांगितले होते. परंतु हांगे यांनी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. 

 

परिसरात पाणीच पाणी 

गेल्या आठ दिवसांपासून लातूर शहरातील बुद्ध गार्डन परिसरात नव्याने अंथरलेल्या जलवाहिनीला गळती लागली आहे. जलकुंभावरून या परिसरात पाणी सोडल्यानंतर बुद्ध गार्डन परिसरात सगळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचबरोबर गळतीच्या पाण्याचे प्रमाण एवढे आहे की या परिसराला तळ्याचे स्वरूप येते.

 

गळती काढून घेऊ

कंत्राटदाराकडून चांगले काम करून घेण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. एखाद्या ठिकाणी गळती झाली असेल तर ती गळती काढण्यात येईल. ती जबाबदारी कंत्राटदाराचीच आहे. कामाचा दर्जा राखणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यात कसूर होणार नाही.   
- सुरेश पवार, महापौर

बातम्या आणखी आहेत...