आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीअायच्या परळी शाखेतील जनटेरला अाग; अनर्थ टळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - परळी येथील इंडिया बँकेच्या जनरेटरला मंगळवारी (दि. २९) दुपारी आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. जनरेटरला आग लागली त्यावेळी बँकेत सुमारे एक हजार ग्राहक वेगवेगळ्या कामानिमित्त आलेले होते. घटना घडल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत बँकेचे कामकाज बंद झाल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.


येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ इंडिया बँकेची शाखा आहे. नियमितपणे कामकाज सुरू होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने बँकेच्या बाहेर भिंतीलगत असलेले जनरेटर सुरू करण्यात आले. जनरेटर सुरू केल्यानंतर कर्मचारी कामकाजात गुंतला. तीव्र उन्हाच्या झळांमुळे व बँकेच्या कामकाजाचा ताण वाढल्याने जनरेटरमधील वायरिंगमध्ये स्पार्किंग झाले. स्पार्किंग होताच जनरेटरने पेट घेतला.  जनरेटर पेट घेताच रस्त्यावरील लोकांनी बँकेत जाऊन याबाबत तत्काळ माहिती दिली. बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी तत्काळ शंभर लिटर डिझेल भरून असलेल्या तीन कॅन उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या. 

 

आग विझवण्यासाठी असलेल्या चार फायर इंस्टिग्यूशरपैकी  केवळ एकच सुरू झाले.  बँक प्रशासनाने व तेथील नागरिकांनी नगर परिषदेत फोन करून घटनेची माहिती दिली. नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

 

शेतकऱ्यांची मोठी गर्दी
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील पात्र शेतकरी नवीन कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेत गर्दी करीत आहेत. दत्तक गावे असलेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. आगीच्या घटनेनंतर सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज सुरू झाले नव्हते. घटनेआधी बँकेतील सर्व संगणक, सर्व पंखे व सर्व एसी चालू होते. शिवाय शहराचे तापमान ४१ अंश सेल्सियस असल्याने उष्णता जास्त होती. विजेचा भार वाढल्याने आग लागण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवस राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी संपावर जाणार आहेत. परंतु परळी येथील इंडिया बँक मंगळवारी (दि. २९) दुपार पासूनच बंद झाली होती.

 

मोठा अनर्थ टळला
जनरेटरमध्ये पन्नास लिटर डिझेल होते. शिवाय तेथेच शंभर लिटर डिझेल ठेवलेले होते. आग डिझेलच्या टँकला लागली असती तर मोठा स्फोट झाला असता. परंतु अग्निशामक दलास आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

 

धुराचे लोट पसरल्याने कर्मचाऱ्यांसह ग्राहक बँकेतून बाहेर
आग लागल्याने धुराचे सर्व लोट बँकेत येऊ लागले. त्यामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांनी  बाहेर पळ काढला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बँकेचा विद्युत पुरवठा खंडित केला.  त्यामुळे बँकेचे कामकाज बंद पडले होते. घटना घडल्यापासून बँकेचे कामकाज व एटीएम मशीन बंद होते. बँकेच्या कामासाठी आलेल्या ग्राहकांची सर्व कामे खोळंबली.

 

 

बातम्या आणखी आहेत...