आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने 60 वर्षांत लुटले नाही तेवढे मोदी सरकारने तीनच वर्षांत लुटले; परभणीत शिवसेनेचा मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि.आठ) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. या वेळी झालेल्या जाहीर सभेत केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर शिवसेनेच्या नेत्यांनी कडाडून टीका केली. काँग्रेसने ६० वर्षांत लुटले नाही तेवढे मोदी सरकारने तीनच वर्षांत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना लुटले, असा आरोप शिवसेनेचे नेते लक्ष्मण वडले यांनी या वेळी केला.    


येथील शनिवार बाजार येथून शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी एक वाजता मोर्चास सुरुवात झाली. मोर्चाच्या सुरुवातीस पाच बैलगाड्या व त्यावर कापसाची झाडे लावलेली होती. त्यानंतर महिला पदाधिकारी व त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्गे मोर्चा शिवाजी पुतळ्याजवळ पोचला. या वेळी झालेल्या जाहीर सभेत आ.डॉ.पाटील, वडले, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राज्यातील तसेच केंद्रातील सरकारवर कडाडून टीका केली.    


या वर्षी अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असताना उत्पादित मालाला शासनदरबारी कवडीमोल भाव मिळत आहे. शासनाने सोयाबीनला ३०५० रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला असला तरी प्रत्यक्षात दोन हजार ते २३०० रुपयांच्याच भावाने सोयाबीनची खरेदी होत आहे. कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तर ९० ते ९५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. त्यातच वीज कंपनीने ग्रामीण भागात १६ ते १८ तास वीज भारनियमन सुरू केल्याने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होईनासा झाला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, असे आरोप या वेळी करण्यात आले.  


५० हजार नुकसान भरपाई द्या
सोयाबीन व कापसाला शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी, कापसाचे बोगस बीटी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. मोर्चात उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदू अवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...