आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात वैजापूरचा जवान शहीद, किरण पोपटराव थोरात यांना वीरगती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चाैक्यांवर गोळीबार केला. यात औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र किरण पोपटराव थोरात (३१) यांना वीरमरण आले.

 

लष्कराच्या प्रवक्त्याने बुधवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली. थोरात हे वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी (पोस्ट ऑफिस लाडगाव) येथील रहिवासी होते. कृष्णा घाटी सेक्टरमधील चकमकीत मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे किरण थोरात गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आरती व नातेवाईक आहेत.


भारताचे चोख प्रत्युत्तर : पाकिस्तानच्या जवानांनी सीमेवर छोटी शस्त्रे, ऑटोमॅटिक रायफली आणि उखळी तोफांनी अचानक गोळीबाराला सुरुवात केली. त्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.


तीन दिवसांत तीन जवान गमावल : सोमवारपासून सीमेपलीकडून पाकच्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांचा आकडा ३ वर पोहोचला आहे. सोमवारी राजौरीत पाकिस्तानच्या गोळीबारात विनोद सिंह आणि जकी शर्मा हे शहीद झाले होते.

 

याच कृष्णा घाटीत ८ दिवसांआधी परभणीच्या शुभमला वीरमरण
पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी भागातच ३ एप्रिल रोजी परभणीच्या कोनेरवाडीचा जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (२१) शहीद झाला होता. तेव्हाही पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. यात शुभमसह ५ जण जखमी झाले.

 

कुलगाममध्ये जवान शहीद, ४ अतिरेकी समर्थकांचा मृत्यू
श्रीनगर - कुलगाम भागात बुधवारी अतिरेक्यांशी उडालेल्या चकमकीत लष्करी जवान सदा गुणाकर राव (आंध्र प्रदेश) शहीद आणि दोन जवान जखमी झाले. अतिरेक्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी जवानांवर दगडफेक केली. त्यांच्याविरुद्धच्या कारवाईत ४ तरुणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, लष्कराच्या वेढ्यात सापडलेले लष्कर-ए-तोयबाचे तीन अतिरेकी पळून गेले.

बातम्या आणखी आहेत...