आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलाला बेदम मारहाण करत 50 हजारांचा ऐवज लुटला; बीड मधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- रात्री टीव्ही पाहताना झोप लागल्याने घराचा दरवाजा उघडाच राहिला. याच संधीचा  फायदा घेत आत प्रवेश केलेल्या दरोडेखोरांनी वकिलाला “पैसे कहाँ रखे है बोल’ असे म्हणत बेदम मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५० हजारांचा ऐवज लंपास केला. ही  घटना बीड शहरातील संत नामदेव नगर भागात मंगळवारी रात्री घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत वकिलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे जिल्ह्यात तळ ठोकून असताना चोरट्यांनी त्यांना ही सलामी दिली आहे.


शहरातील धानोरा रोडवरील संत नामदेव नगरमध्ये अॅड. अरविंद सुधाकर देशमुख यांचे घर आहे. ते जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करतात. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ते टीव्ही पहात होते. टीव्ही पाहत असतानाच त्यांना झोप लागली. त्यामुळे घराचे मागील दार बंद करण्याचे राहून गेले. याचाच फायदा घेत मध्यरात्री पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून अरविंद देशमुख यांना टामीने मारहाण केली. पैसे कहाँ रखे है बोल असे म्हणत त्यांना मारहाण करण्यात आल्याने त्यांनी जीव वाचवण्यासाठी कपाटात पैसे असल्याचे सांगितले. चोरट्यांनी कपाटातून १२ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५० हजारांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत अॅड. देशमुख यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

 

पोलिसांची भेट
या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

आयजींना सलामी
जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे देखील मंगळवारीच जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मंगळवारी ते बीड शहरात मुक्कामी असताना झालेल्या या प्रकाराने तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

 

 

ठसेतज्ज्ञ, श्वानपथक पाचारण
घटनेनंतर ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांनी चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूंचे ठसे घेतले आहेत. श्वानाला मात्र फारसा मार्ग दाखवता आला नाही.


तपासासाठी चार पथके
घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्यात आला आहे. तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली असून संशयितांकडे चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
- नानासाहेब लाकाळ, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे

 

बातम्या आणखी आहेत...