आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेतकरी जखमी, तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पकडण्यात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई - बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाल्याचा प्रकार भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव परिसरात घडला. जखमींपैकी एका शेतकऱ्यास अधिक उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या परिसरातील शेतकऱ्यांनी तब्बल दहा तास बिबट्याचा थरार अनुभवला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास  ग्रामस्थ, पोलिस व वन विभागाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पकडण्यात यश आले.  


सध्या खरिपाच्या पेरणीची तयारी करण्यासाठी शेतकरी मशागतीच्या कामात व्यग्र आहे. त्यातच शनिवारी सकाळी पिंपळगाव रेणुकाई व अवघडराव सावंगी या दोन शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले. बिबट्या आल्याचे लक्षात येताच या दोन्ही शिवारातील शेतकऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्या असलेल्या ओढ्याकडे धाव घेतली. त्या वेळी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. यात नामदेव गाडेकर हा युवक जखमी झाला. बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका करण्यासाठी आत्माराम सखाराम पाटील पाईक यांनी काठीने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला.

 

त्या वेळी बिबट्याने पाटील पाईक यांच्यावरही हल्ला चढवला. यात बिबट्याने त्यांच्या पायाचा चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. हा सर्व प्रकार लक्षात येताच परिसरातील शेतकरी बंडू गाडेकर, प्रल्हाद आहेर,भानुदास गावंडे, आमेर चाऊस हे  काठ्या घेऊन धावत आले व त्यानंतर बिबट्याला तेथून हुसकावून लावले. त्यानंतर बिबट्या जवळील एका वखारीत शिरला. विशेष म्हणजे परिसरात बिबट्या आल्याच्या भीतीने या वखारीत अगोदरच आशा किशोर पाटील पाईक या आपल्या चार मुलांसह लपून बसल्या होत्या. मात्र समोर बिबट्या दिसताच त्यांनी हिमतीने वखारीचा दरवाजा बंद केला. अाशा व त्यांची मुले वखारीच्या आत व बिबट्याने दरवाजात ठाण मांडलेले असे चित्र या ठिकाणी निर्माण झाले. या ठिकाणी मोठा जनसमुदाय जमा झाला.

 

त्यानंतर पारध पोलिस ठाण्यासही ही माहिती देण्यात आली. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत हे आपला फौजफाटा घेऊन या ठिकाणी हजर झाले. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करून धीर दिला व वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास सहायक वनसंरक्षक  जी.एम.शिंदे यांच्यासह श्रीकांत विकलोड,वनपाल एस.एल.दोडके व वनरक्षक दिलीप जाधव यांनी बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळाले.  

 

त्यांच्या धाडसाचे कौतुक  
बिबट्याने आक्रमक रूप धारण केलेले असतानाही या परिसरातील शेतकरी नामदेव गाडेकर, आत्माराम पाटील पाईक, बंडू गाडेकर, पंजाब गाडेकर, प्रल्हाद आहेर, भानुदास गावंडे, अामेर चाऊस यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी धाडस केल्यामुळेच आक्रमक झालेला हा बिबट्या एका जागेवर थांबून राहिला. बिबट्या आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी येथे गर्दी केली होती.  

 

डोळ्यासमोर साक्षात मृत्यू उभा होता  
बिबट्या आल्याची चर्चा कानावर पडताच मी माझ्या मुलांना घेऊन शेजारच्या वखारीत अाश्रय घेतला. काही वेळातच बिबट्या दरवाजाबाहेर उभा दिसला. पोटच्या गोळ्याकडे पाहून मोठ्या हिमतीने मी दरवाजा आतून बंद केला. आज मला साक्षात मृत्यूचे दर्शन झाले.
आशा किशोर पाटील पाईक, महिला,अवघडराव सांवगी.  

 

जंगलातील पाणवठे झाले कोरडे 
जंगलातील पाणवठे कोरडे झाल्यामुळे बिबट्या गाववस्तीकडे आला असावा. आम्ही त्याला जेरबंद केले असून जालना येथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला गौताळा किंवा इतर अभयारण्यात सोडण्यात येईल.  
जी.एम.शिंदे, सहायक वनसंरक्षक,जालना. 

 

वाचवा असा आवाज येताच धाव घेतली
मी शेतात मिरचीला ठिबकद्वारे पाणी देत असताना शेजारील नाल्यातून वाचवा वाचवा असा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर आवाजाच्या दिशेने धावलो. त्या वेळी आम्ही चारपाच जणांनी काठ्या घेऊन बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला.  दोन्ही जखमींची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. 
- भानुदास गावंडे, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई

 

 

 

पुढील स्लाईडवर पहा, घटनेचे  व्हिडीओ आणि फोटो..... 

 

 

बातम्या आणखी आहेत...