आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्रीने ‘नकोशी’ला झुडपात फेकून दिले; पण काळ्या आईच्या कुशीत मिळाले जीवदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/ दानापूर - तिला दोनच तास आईची कुस आणि ऊब मिळाली. नंतर मात्र ती तिला  ‘नकोशी’ झाली. जन्मानंतर आईने तिला गोणीत टाकून रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात टाकून दिले. मात्र तेथेही तिला आईची कुस मिळाली. ती कुस होती धरणी मातेची, काळ्या आईची. आईला नकोशी झालेल्या या दोन तासांच्या स्त्री अर्भकाने टाहो फोडला आणि बघता बघता सारे गावच तिचे आई-बाबा झाले. निर्दयीपणे टाकून दिलेल्या या बालिकेच्या अंगाला काळी माती चिकटल्याने मुंग्या लागल्या नाही आणि तिचे प्राण वाचले, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.


हृदय हेलावणारी ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर रोडवर घडली.  या नकोशीचा रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने भोकरदन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवले. या “नकोशी’च्या दुचाकीवरून दोघे जण गावाकडे जात होते. याप्रसंगी रस्त्याच्या कडेहून लहान बाळ रडण्याचा आवाज आल्याने दुचाकी थांबून रस्त्याच्या कडेला पाहिले.  तेथील झुडपात त्यांना गोणी दिसली. आतून माती चिकटलेल्या या गोणीत हे अर्भक दिसून आले. या ग्रामस्थांनी त्या अर्भकाला बाहेर काढले. हा प्रकार इतर जाणाऱ्या-येणाऱ्या ग्रामस्थांच्याही निदर्शनास आला. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. 

 

यानंतर ग्रामस्थांनी त्या अर्भकाला गावातील उपकेंद्रात उपचारासाठी नेले होते. परंतु, हे उपकेंद्र बंद होते. यामुळे ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. दोन तास उशिरा का होईना गावात पोलिस पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्याच मदतीने या अर्भकाला भोकरदनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यावर उपचार केले. पुढील उपचारासाठी  तिला जालना येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.  

 

सलाइन देऊन उपचार 
‘नकोशी’ला रुग्णालयात आणल्यानंतर तिला सलाइन लावून इतरही उपचार करण्यात आले आहेत. उपचारानंतर तिच्या  प्रकृतीत सुधारणा झाली आहे. 
- डॉ. शेख युसूफ, १०८ अॅम्ब्युलन्स पथक, भोकरदन. 

 

डीएनए चाचणी करणार 
सध्या या बालिकेवर उपचार सुरू अाहेत. सध्या तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून तिची प्रकृती चांगली आहे. तिची आणि गावात प्रसूत झालेल्या मातांची डीएनए चाचणी केली जाणार आहे.  
- बी. जे. शिंदे, बीट जमादार

 

रेल्वेत सापडलेल्या ‘त्या’ बाळाचेही घेतले ठसे  
आठ दिवसांपूर्वी परतूर येथे रेल्वेत डब्यात एका स्त्री जातीच्या अर्भकाला ठेवून मातेने पळ काढला होता. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांत खळबळ उडाली होती. प्रवाशांच्या सजगतेमुळे या बाळाला जालना पोलिसांच्या हवाली केले होते. यात रेल्वे पोलिस पांडूरंग चव्हाण, गायकवाड, सय्यदा यांनी त्या बाळाला महिला व बाल रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले. ते बाळ सध्या शिशुगृहात असून सुखरूप आहे.  त्या बाळाचे रुग्णालयात फूट प्रिंट  (σपायाचे ठसे) पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिस पोलिस उपनिरीक्षक केंद्रे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...