आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची धडपड: जातीवरील कलंक धुण्यासाठी नोकरी सोडून सुरू केला प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- एखाद्या लहान मुलाने आपल्याला शिवी दिली तर आपली प्रतिक्रिया काय असेल? रागीट व्यक्ती त्याच्या कानफटीत लगावेल.  एखादा प्रत्युत्तर देईल किंवा  मनातल्या मनात  शिवी देऊन रस्त्याने लागेल. पण हा तरुण शिवी ऐकून थोडाही संतापला नाही. उलट त्याने शांतपणे शिवी ऐकून घेत त्यांच्या शिक्षणासाठी धडपडू लागला.  पारधी समाजातील मुले गुन्हेगार होऊ नयेत त्यांचे भवितव्य वाचवण्यासाठी, त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तो सरसावला. त्याचे नाव सुधीर भोसले.  पुण्यातील नोकरी सोडून तो  बीडमध्ये आला. आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून तो  ७२ पारधी  मुलांना पाच वर्षांपासून शिक्षणाचे धडे देत आहे. पारधी समाजात त्याने विश्वास जागवला आहे. 


आष्टी तालुक्यातील वाळूंज गावातील मजूर  पालकुट भोसले यांचा मुलगा सुधीर  याने पाटोद्यातून बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर एमएचसीइटीची परीक्षा दिली.  कमी गुणांमुळे शासकीय अभियांत्रिकीऐवजी कोपरगावच्या खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला.  दरम्यान सुधीरचा आष्टीत दुचाकी अपघात होऊन त्यात एक पाय व हात फ्रॅक्चर झाला. यासाठी मोठा खर्च झाल्याने  पुढील शिक्षणासाठी कोपरगावला जाताच आले नाही. शेवटी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याने पुण्यातील महिंद्रा इंजिनिअरिंग येथे १३ हजारांवर  सुपरवायजर म्हणून काम सुरू केले. 


२०१२ मध्ये पुणे रेल्वे स्टेशनवर कृष्णा माळसिंग या मुलाने सुधीरकडे भीक मागितले.  सुट्टे  पैसे नसल्याने सुधीरने त्याला बाजूला सारल्याने कृष्णाने सुधीरला पारधी भाषेत शिवी हासडली.  सुधीरही याच समाजातील असल्याने त्याला ही शिवी समजली.  त्याने कृष्णाला जवळ घेऊन चौकशी केली.  माझे वडील जेलमध्ये असून आईने दुसरे लग्न केले. आजी, आजोबा मला सांभाळत असून आम्ही सर्व जण १० वर्षापासून स्टेशनवर भीक मागत असल्याचे कृष्णाने सांगितले. तेव्हा सुधीरला आपले बालपण आठवले.  सुधीरनेही लहानपणी बीड, नगर, दादर येथे भीक मागितली होती. परंतु नंतर तो शिकल्याने  समाजातील लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. आपल्या समाजातील मुलांची ही परवड पाहून त्याने पुण्यातील काही मित्रांना बरोबर घेऊन  रेल्वेस्टेशनवरील ३५ जणांना कपडे, शाली, साहित्य भेट दिले.  


मित्रांनी सुधीरला तुझ्या समाजातील मुलांसाठी काही तरी कर असा सल्ला दिला. त्यामुळे अशा उपेक्षित मुलांना शिकवण्याचा निश्चय करून २०१३ मध्ये पुण्यातील नोकरी सोडून सुधीरने गाव गाठले.  कुटुंबातील लोकांनी  त्याला विरोध केला. पण कोणाचेही  न ऐकता उस्मानाबाद, बीड, नगर, औरंगाबाद या चार जिल्ह्यातील पारधी वस्त्यांवर जाऊन त्याने सर्व्हे सुरू केला.   


सरपंचांना भेटून आमचे लोक तुमच्याकडे काम करतील. त्यांना कामाचे पैसे दिले तर ते चोरी करणार नाहीत, असा विश्वास दिला.  त्यांना रहिवासी प्रमाणपत्र मिळवून द्या, अशी मागणीही केली.  सरपंचांनी सुधीरवर विश्वास ठेवून  शिरूर, आष्टी, कडा, परंडा येथे पारधी समाजातील लाेकांना रेशनकार्ड मिळवून दिले. अशा लोकांची मुले आणि पुण्याहून बरोबर आणलेल्या ३५ मुलांना घेऊन  बीडमध्ये धानोरा रोडवरील शिराळे यांच्या खोलीत आदिवासी समीकरण नावाने पारधी, अनाथ, शाळाबाह्य, कैद्यांच्या मुलांसाठी सामाजिक प्रकल्प सुरू केला.चंपावतीचे प्राचार्य हौसराव पवार यांनीही मदतीचा हात दिला. बीडमध्ये सकाळी आठपासून तो या मुलांसाठी एक एक रुपया जमवू लागला. दरम्यानच्या काळात  प्रकल्पातील दहा मुले निघून गेली.  मुलांना मराठी येत नसल्याने त्यांना बीडमध्ये कोणतीही शाळा प्रवेश देत नव्हती. 


पत्रकार संतोष मानूरकर यांच्या प्रयत्नाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ८० विद्यार्थ्यांना नवीन कपडे दिले. २०१५ मध्ये बालेपीर येथे प्रा.सुशीला मोराळे यांनी संत गाडगे महाराज शाळेत मुलांसाठी तीन खोल्या दिल्या. ही जागा पुरत नव्हती. बीड येथील वेदशास्त्र संपन्न धुंडीराज शास्त्री पाटांगणकर यांनी इमामपूर येथील त्यांचा मोठा हॉल मोफत दिला. सध्या या हॉलमध्ये ७२ मुले राहत आहेत.

 

शिक्षणामुळे आशेचा  किरण 
प्रकल्पातील मुले अक्षरे गिरवू लागली.  बसच्या पाट्या वाचू लागली, इंग्रजी कविता म्हणून लागली. राहणीमानही बदलले.  पालावरील दुसरी मुले त्यांच्याकडे कुतूहलाने पाहू लागली. शिक्षणामुळे हा बदल होत असून माझा पोरगा बी साहेब होईल, हा आशेचा किरण पालकांत जागला. आणखी मुले या प्रकल्पाकडे आकर्षित झाली. सध्या या वसतिगृहातील ७२ पैकी ६० मुले बीडच्या अशोकनगर जि. प. शाळेत शिकत आहेत.


एक विद्यार्थी शाळेत दुसरा
बीडच्या भगतसिंग विद्यालयात शिकणारे एकनाथ  काळे, मोतीराम काळे, आशिष काळे, महेंद्र काळे, बाबासाहेब काळे, पायनेर चव्हाण ही  सहा मुले मागील वर्षी दहावीत उत्तीर्ण झाली. एकनाथ  ६४ टक्के गुणांनी शाळेत दुसरा आला. मोतीराम व महेंद्र हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यातील तिघे सध्या उस्मानाबादच्या शासकीय वसतिगृहात ११ वीत शिकत आहेत. 


संघर्ष सुरूच
सुधीर भोसलेंचा आर्थिक परिस्थितीशी संघर्ष सुरूच आहे.  तो दुचाकीवरून बीड शहरातील हॉस्पिटल, शासकीय कार्यालये, शाळा, दवाखाना, येथे जाऊन प्रकल्पासाठी एक एक रुपया गोळा करतोय.  या कामात त्याला पत्नी भाग्यश्री व भाऊ मोहन  मदत करत अाहेत. या प्रकल्पात मुलांसाठी वाचनालय, आजारी मुलांसाठी स्वतंत्र खोली नाही. 


परिपाठ आणि व्यायाम
प्रकल्पातील मुलांची  दिनचर्या एखाद्या मराठी शाळेला लाजवणारी आहे. पहाटे पाचला मुले व्यायाम करतात. त्यानंतर परिपाठ,  देशभक्तीपर गीते, प्रार्थना, सुविचार, बोधकथा, थोर व्यक्तींच्या चरित्राचे वाचन करतात.   दुपारी ती  कबड्डी, खो-खो, क्रिकेटमध्ये रमलेली असतात.