आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध्या तासात मुलीच्या विक्रीचा व्यवहार; राजस्थानला नेण्याचा प्रयत्न, 10 ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- नांदेड येथील युवती शिर्डीहून परत जात असताना जालना स्थानकावर रेल्वेची वाट पाहत थांबली. त्या वेळी खोटी ओळख सांगून एक महिला तिला घरी घेऊन गेली. त्यानंतर फोनवर काही लोकांशी संपर्क करून अवघ्या अर्ध्या तासात त्या युवतीला राजस्थान येथे विकण्याचा व्यवहार केला. व्यवहार पूर्ण होताच रेल्वेने युवतीला जबरदस्तीने राजस्थानकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू असताना युवतीने आरडाओरड केली. काहींनी पोलिसांना याची माहिती दिली. १० जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले.


नांदेड येथील ही युवती मित्रासोबत शिर्डी येथे दर्शनासाठी गेली होती. दर्शन करून शिर्डीहून परत येत असताना ते दोघे रेल्वेची वाट पाहत जालना स्थानकावर थांबले. त्या वेळी रेल्वेस्थानक परिसरातच राहणाऱ्या गीताबाई जाधव हिने या युवतीशी बोलण्याच्या ओघात ओळख करून घेतली. आपण नातेवाईक असल्याचे सांगितले. त्यानंतर जाधव नावाची ही महिला या युवतीला व तिच्या मित्राला आपल्या घरी घेऊन गेली. त्या युवतीच्या मित्राला गीताबाई जाधव हिने बाहेर पाठवून दिले. त्यानंतर चंदनझिरा येथील विठोबा बनसिंग तोडावत व राम ज्ञानदेव जाधव या दोघांना घरी बोलावून ही युवती त्यांना दाखवली. त्यानंतर गीता जाधव व या दोघांनी या युवतीला १ लाख २५ हजार रुपयांत राजस्थानात विक्रीचा व्यवहार केला. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर वरील तिघांसह परमेश्वर उत्तम हिवाळे, कौतिक ऊर्फ बाबूराव राणूबा बनकर, विकास दत्तू शिंदे,ज्योती अशोक तायडे,सुशीला मोहनलाल घांची,चौपाराम वरदाराम घांची,सुरेशकुमार नेमाराम परमार व पवार नावाच्या एका महिलेच्या मदतीने या युवतीला हे सर्व आरोपी लग्न लावून देण्यासाठी राजस्थानात घेऊन जात होते. मात्र त्याच वेळी काहीतरी गडबड असल्याचे युवतीच्या लक्षात आले. तेव्हा या युवतीसह तिच्या मित्राने आरडाओरड केली. काही नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. माहिती मिळताच कदीम जालना ठाण्याचे पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातून पीडित मुलीची सुटका केली.  


यांच्यांविरुद्ध गुन्हा दाखल 
 गीता जाधव,विठोबा बनसिंग तोडावत,राम ज्ञानदेव जाधव,परमेश्वर उत्तम, हिवाळे,कौतिक ऊर्फ बाबूराव राणूबा बनकर,विकास दत्तू शिंदे,ज्योती अशोक तायडे, सुशीला मोहनलाल घांची,चौपाराम वरदाराम घांची,सुरेशकुमार नेमाराम परमार व पवार नावाच्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...