आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले पळवण्याच्या संशयावरून लातुरात मारहाणीचे प्रकार वाढले; पोलिस त्रस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर -  आपल्या शहरात, गावात मुले पळवण्याची टोळी आली असून त्यात महिला, वृद्ध, तरुण अशा सर्वांचाच समावेश आहे अशा प्रकारचे संदेश आणि काही अस्पष्ट छायाचित्र सोशल मीडियावरून फिरत आहेत. यामुळे चार ते पाच ठिकाणी समूहाकडून संशयित समजून मारहाण होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलिस त्रस्त झाले असून चुकीचे मेसेज पुढे पाठवल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.   


लातूरसह मराठवाड्यात सध्या सोशल मीडियावरील मुले पळवणाऱ्या टोळीच्या संदेशामुळे सामूहिक मारहाणीचे प्रकार घडत आहेत. मुले पळवणारी टोळी आपल्या गावात दाखल झाली असून त्यापासून सावध राहा, त्यांना तिथेच पकडा असे संदेश एका अस्पष्ट छायाचित्रणासह फिरत आहेत. यावरूनच लातूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात औसा येथे एका तरुणाला मारहाण झाली. तर लातूर जिल्ह्यातल्याच औराद शहाजनीजवळ एका तरुणाला मारहाण करून त्याचा टमटम जाळण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत यातील दोनही संशयित सामान्य नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यांना जमावाकडून विनाकारण झालेली मारहाण आणि त्यांच्या मालमत्तेचे झालेले नुकसान याची भरपाई कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी लातूर शहरातील विक्रमनगर आणि इंडियानगर भागातही असाच प्रकार झाला.

 

दुपारच्या वेळी तीन महिला रस्त्यावरून जात असताना त्या मुले पळवणाऱ्या टोळीच्या सदस्य असल्याचे एकाने सांगितले. त्यावरून त्यांना जमावाने घेरले आणि जबर मारहाण केली. एकाने पोलिसांना हा प्रकार कळवल्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले. त्यांनी तीनही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचा असल्या कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन संतप्त जमावाकडून मारहाणीचे प्रकार होत असल्यामुळे पोलिसही वैतागले आहेत. सोशल मीडियाचा फायदा होण्याऐवजी तोटा होत असून त्याचा पोलिसांवर अधिकच ताण येत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

...तर कारवाई करणार   
सामान्य नागरिकांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा. हे एक प्रभावी माध्यम आहे. मात्र त्याचा चुकीचा वापर झाल्यास ते समाजासाठीच अहितकारक ठरेल. मुले पळवणारी टोळी समजून सामान्य निष्पाप नागरिकांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहे. अशा प्रकारचे मेसेज पुढे पाठवून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी दिला आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...